थरारक पाठलागाने वाळू डंपर पकडला
By admin | Published: May 27, 2016 10:57 PM2016-05-27T22:57:43+5:302016-05-27T23:12:59+5:30
तहसीलदारांची कारवाई : डंपरसह चालकावर कारवाई; ३ लाख २ हजार ४०० दंड
खेड : महाड येथून ६ ब्रास वाळू भरून लोटेकडे जाणाऱ्या डंपरला नायब तहसीलदार रवींद्र वाळके यांनी अडविल्यानंतरही डंपरचालकाने रस्त्यामध्येच वाळू ओतून पलायन करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून भरणे येथे डंपरला पकडण्यात यश आले. वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेण्यात आला असून, डंपर चालक व मालक मकरंद प्रभाकर भागवत (रा़ महाड) यांना ३ लाख २ हजार ४०० रूपये दंड ठोठावण्यात आला असून, डंपर उपविभागीय अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे़
डंपरचालक व मालक मकरंद प्रभाकर भागवत (रा़ चवदार तळे, महाड) यांच्यावर खेडचे तहसीलदार अमोल कदम यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ४८ (७)(८), तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दि़ १२ जून २०१५ नुसार दंड ठोठावला असून, डंपर (एमएच ०६ बीडी ७६५७) शासन जमा करण्यात आला आहे.
गुरूवारी सायंकाळी ४.४० वाजण्याच्या सुमारास खेडचे तहसीलदार अमोल कदम यांना महाड येथून ६ ब्रास विनापरवाना वाळू भरलेला डंपर लोटेकडे जात असल्याची माहिती मिळाली होती.़ त्यामुळे कदम यांनी निवासी नायब तहसीलदार रवींद्र वाळके यांना या मोहिमेसाठी पाठविले़ या डंपरचा वाळके यांनी भरणे नाकापासून पाठलाग सुरू केला़ त्यानंतर हा डंपर महामार्गावरील बोरज (ता़ खेड) येथे पकडण्यात आला.
त्यानंतर डंपरचालक मकरंद भागवत याला वाळके यांनी डंपर घेऊन खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात येण्यास सांगितले़ वाळकेही आपल्या शासकीय वाहनाने तहसीलदार कार्यालयाकडे येण्यास निघाले़ मात्र, बराच वेळ झाला तरी डंपर न आल्याने वाळके यांना शंका आली़ त्यामुळे वाळके यांनी पुन्हा आपली गाडी बोरजच्या दिशेने वळवली़ यावेळी डंपरचालक भागवत हा बोरज पुलानजीकच्या मोकळ्या जागेत वाळू खाली करीत असल्याचे निदर्शनास आले़
यावेळी त्यांनी ३ ब्रास वाळू ओतली़ यावेळी वाळके यांनी चालक भागवत याला हटकले असता, त्याने पलायन केले़ डंपचालकाने पळ काढल्यामुळे या डंपरचा वाळके यांनी पाठलाग सुरू केला़ एखाद्या चित्रपटात शोभेल असा पाठलाग वाळके यांनी केला. डंपर मुंबईच्या दिशेने जात असतानाच भरणे पोलीस चौकीतील पोलिसांना वाळके यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे पोलीसांचीही मदत घेण्यात आली. डंपरचालक थांबण्यास तयार नसल्याचे पाहून अखेर पोलिसांनी भरणे येथील काळकाई मंदिरासमोर महामार्गावरच आपली गाडी डंपरच्या समोर आडवी घालत डंपरचालक मकरंद भागवत याला डंपरसह ताब्यात घेतले़ डंपरचालक आणि डंपरवर तहसीलदार अमोल कदम यांनी रितसर कारवाई केली आहे़ सध्या डंपर उपविभागीय अधिकारी यांच्या ताब्यात आहे़ या मोहिमेमध्ये निवासी नायब तहसीलदार रवींद्र वाळके यांच्यासह तलाठी ढगे, कनिष्ठ लिपीक अमोल ढोले, अलमाडे, तसेच भरणे चौकीतील पोलीस कर्मचारी यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. यामुळे आता वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)
कडक कारवाई : धाबे दणाणले
खेडचे तहसीलदार रवींद्र वाळके यांनी वाळूमाफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रायगड जिल्ह्यातून येणाऱ्या वाळूवर तहसीलदारांची करडी नजर असल्याने चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे या कारवाईनंतर दिसत आहे.