कंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:37 AM2019-11-01T11:37:10+5:302019-11-01T11:40:16+5:30

तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, नुकतेच याविषयी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना एका पत्राद्वारे या कुटुंंबियांनी कळविले आहे.

Tibetan harassment by living in a container | कंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराण

कंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराण

Next
ठळक मुद्देकंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराणपाणी व विजेचा तुटवडा, कुटुंबियांपुढे प्रश्न

संदीप बांद्रे 

चिपळूण : तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, नुकतेच याविषयी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना एका पत्राद्वारे या कुटुंंबियांनी कळविले आहे.

अवघ्या चिपळूणवासियांचे हृदय पिळवटून टाकणारी घटना तिवरे येथे जुलै महिन्यात घडली. या घटनेत एकूण २२ जणांचा बळी गेला. या धक्क्यातून हळूहळू तिवरेवासीय सावरत असताना त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा कायम आहे. एकूण ४५ कुटुंबियांचे पुनर्वसन अलोरे येथील शासकीय जागेत करण्याचा प्रस्ताव आहे.

याबाबतची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. तूर्तास येथील १० कुटुंबियांचे पुनर्वसन तिवरे येथेच कंटेनरमध्ये केले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक व शासनाकडून प्रत्येकी पाच असे एकूण १० कंटेनर उपलब्ध करून दिल्यानंतर प्रत्येक कंटेनरमध्ये एका कुटुंबाची व्यवस्था करण्यात आली आहे.

उघड्या माळरानावर तापताहेत कंटेनर

सुरुवातीला धरणाच्या वरील बाजूस असलेल्या जागेत कंटेनर ठेवण्यात येणार होते; मात्र तेथे डोंगराला भेगा गेल्याने गावातीलच उघड्या माळरानावर हे दहाही कंटेनर ठेवण्यात आले आहेत. आॅक्टोबर हिटमुळे तापमान वाढले असल्याने त्याची झळ कंटेनरमधील कुटुंबियांना बसू लागली आहे.

दिवसभरात कंटेनर तापत असल्याने आतमध्ये अंगाची लाहीलाही होते. पंखा लावूनही काहीच उपयोग होत नाही. त्यातच कंटेनरबाहेर पडावे तर उन्हाचे चटके आणि रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होत आहे. स्वच्छतागृहाचे सांडपाणी व मलमूत्रही उघड्यावर सोडलेले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

एकाच मीटरवर सर्वांना वीज पुरवठा

येथील दहाही कंटेनरना एकाच मीटरवरुन वीजपुरवठा करण्यात आला आहे. घरगुती जोडणी पद्धतीने हा वीजपुरवठा केला असल्याने अनेकदा हा पुरवठा अपुरा ठरतो. त्यातच परिसरात पथदीप नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत.

झरे आटण्याच्या मार्गावर

धरण फुटीमुळे तिवरेतील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या गावातील पाणीयोजना पूर्णत: ठप्प झाली असून, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांनी पुरवलेल्या पाण्याच्या टाक्याही आता पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत पुनर्वसित कुटुंबियांसाठी झऱ्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत शिल्लक आहे; मात्र तोही आता हळूहळू आटू लागल्याने येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

दोन महिन्यात कोणी फिरकलेच नाहीत

गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी म्हणजेच ३० आॅगस्ट रोजी घाईघाईत १० कुटुंबियांची कंटेनरमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली. तेव्हापासून बळीराम चव्हाण, तुकाराम कनावजे, तानाजी चव्हाण, नारायण गायकवाड, कृष्णा कातुरडे, सखाराम तांबट, भगवान धाडवे, राधिका चव्हाण, लक्ष्मी चव्हाण व माधव धाडवे यांचे कुटुंबीय या कंटेनरमध्ये राहात आहेत. त्यानंतर आजतागायत कोणताही प्रशासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी येथे फिरकलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांतर्फे तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे; त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 


कंटेनरमधील पर्यायी व्यवस्था ही तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात आली होती; मात्र आता दोन महिने होऊनही येथेच राहावे लागत आहे. कंटेनरमधील रहिवास गरम्यामुळे नकोसा झाला असून, शासनाने याची वेळीच दखल घ्यावी.
- नारायण गायकवाड,
ज्येष्ठ ग्रामस्थ, तिवरे



घाईघाईत बसवण्यात आलेल्या कंटेनरची रचना चुकीच्या पद्धतीने झाली असल्याने वाढत्या उष्म्याचा त्रास होत आहे. शिवाय कंटेनरची लेव्हल योग्य पद्धतीची नसल्याने आतमध्ये असलेल्या स्वच्छतागृहातील पाणी तेथेच साचून राहाते.
- बळीराम चव्हाण,
तिवरे

Web Title: Tibetan harassment by living in a container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.