Ratnagiri: राजापूरच्या नदीपात्रात भरतीचे पाणी आल्याने वाहने अडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 02:30 PM2024-05-09T14:30:35+5:302024-05-09T14:31:50+5:30

राजापूर : शहरातील खर्ली नदीपात्रात बुधवारी दुपारी अचानक आलेल्या भरतीच्या पाण्यामुळे काही चारचाकी वाहने अडकून पडली. कडकडीत उन्हाळ्यात कोरड्या ...

Tidal water in the river bed of Rajapur, Vehicles stuck | Ratnagiri: राजापूरच्या नदीपात्रात भरतीचे पाणी आल्याने वाहने अडकली

Ratnagiri: राजापूरच्या नदीपात्रात भरतीचे पाणी आल्याने वाहने अडकली

राजापूर : शहरातील खर्ली नदीपात्रात बुधवारी दुपारी अचानक आलेल्या भरतीच्या पाण्यामुळे काही चारचाकी वाहने अडकून पडली. कडकडीत उन्हाळ्यात कोरड्या झालेल्या नदीत अचानक पाणी आल्याने हा प्रकार घडला. वाहने बाहेर काढण्याचे प्रयत्नही अयशस्वी झाले. नदीला पाणी आल्याचे कळताच काठावर बघ्यांची गर्दी जमली.

राजापूर शहरात दरवर्षी पावसाळी दिवसात हमखास पूर येतो आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होते. साधारण डिसेंबर महिन्यात या नदीतील पाणी कमी होते आणि तेव्हापासूनच बाजारपेठेत कामाला येणारे लोक आपल्या गाड्या नदीपात्रात लावून ठेवतात. मंगळवारी अमावस्या होती. अमावस्येला मोठी भरती येते. त्यामुळे बुधवारी भरतीचे पाणी नदीमध्ये आले आणि तेथे लावलेल्या अलिशान गाड्यांसह एक ट्रॅक्टर आणि एक माल वाहतुकीची मोठी गाडी, एक रिक्षा ही वाहने अडकून पडली.

पाणी वाढू लागल्यानंतर काठाजवळ असलेली काही वाहने बाहेर काढण्यात आली. मात्र भरतीच्या पाण्याने नदीपात्र व्यापल्याने त्यामध्ये पार्क केलेली अनेक वाहने अडकून पडली होती. त्यातील एकदोन वाहने बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. मात्र ते सफल झाले नाहीत. खर्ली नदीपात्रात भरतीचे पाणी भरल्याने वाहने अडकल्याची वार्ता शहरात पसरली आणि नदीच्या काठावर बघ्यांची गर्दी जमली.

महापुराला लगाम घालण्यासाठी शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नदीपात्रात गतवर्षी गाळ उपसा करण्यात आला. त्यामुळे नदीचे पात्र चांगलेच रुंद झाले असल्याने भरतीच्या वेळीही झटपट पाणी भरत असल्याचा अनुभव आला. काही दिवसांपूर्वीही असेच भरतीचे पाणी आले होते व त्यावेळीही त्या पाण्यावर वाहने तरंगताना पाहायला मिळाली होती.

Web Title: Tidal water in the river bed of Rajapur, Vehicles stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.