वरवडेत भरतीचे पाणी शिरले थेट ग्रामस्थांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:24+5:302021-04-29T04:23:24+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील खारलँड बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवून काम घेतलेला ठेकेदार गायब झाला आहे. अर्धवट अवस्थेतील ...
रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील खारलँड बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवून काम घेतलेला ठेकेदार गायब झाला आहे. अर्धवट अवस्थेतील कामामुळे मागील चार दिवस भरतीचे पाणी थेट रहिवासी भागात शिरले आहे. मंगळवारी पहाटे भरतीचे पाणी वरवडे भंडारवाडी येथील ग्रामस्थांच्या घरापर्यंत पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. संबंधित ठेकेदार आणि खारलँड विभागाने तातडीने हे काम हाती न घेतल्यास प्रसंगी आंदोलन छेडू, असा इशारा येथील माजी सरपंच निखिल बोरकर यांनी दिला आहे.
वरवडे गाव हे खाडीकिनारी वसले आहे. खाडीच्या भरतीचे पाणी गावात शिरू नये यासाठी खारलँड विभागाने मुख्य रस्त्यानजीक बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले. कामाच्या पूर्ततेसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र, काम अर्धवट ठेवून ठेकेदार गायब झाला आहे.
वरवडे भंडारवाडा येथे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदार आणि खारलँड विभागाचे दुर्लक्ष यामुळे मागचे काही दिवस हे काम पूर्णतः बंद आहे. याचा फटका मात्र आता गावातील ग्रामस्थांना बसला आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी बंधाऱ्याची मोरी उघडण्यात आली आहे. ही मोरी बंद न करताच ठेकेदार गायब झाला आहे. मोरी उघडी राहिल्याने भरतीचे पाणी आता गावात शिरू लागले आहे.
मागील चार दिवसांपासून भरतीचे पाणी भंडारवाडीमधील घरापर्यंत शिरले आहे. रहिवासी भागापर्यंत पाणी शिरल्याने अनेक नारळी पोफळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. याबाबत माजी सरपंच निखिल बोरकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी खारलँडच्या अधिकाऱ्यांना कळविले. मात्र, यावर अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातवरण आहे. भरतीचे पाणी अनेक घरांजवळ साचून राहिल्याने परिसरात साथीचे आजार पसरण्याची तसेच डासांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. कोरोनाच्या संकटात आणखी नवे आजार होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
ठेकेदाराच्या चुकीने गावातील ज्या ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे, त्यांना त्वरित ठेकेदार आणि संबंधित विभागाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. आरोग्य विभागानेही लवकर या भागाची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी माजी सरपंच निखिल बोरकर यांनी केली आहे. अन्यथा स्वतः जिथे मोरीचे काम सुरू आहे, तिथे डंपरने माती टाकून बंद करू. ग्रामस्थांना होणारा त्रास लवकर थांबवा, अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देणार असल्याचे निखिल बोरकर यांनी सांगितले.