Ratnagiri Crime: वाघाच्या कातड्याची तस्करी, चिपळुणात तिघे ताब्यात
By संदीप बांद्रे | Published: December 31, 2022 04:31 PM2022-12-31T16:31:29+5:302022-12-31T16:51:03+5:30
चिपळूण वन विभाग व दहशतवाद विरोधी पथकाने केली कारवाई
चिपळूण : पूर्ण वाढीच्या पट्टेरी वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना चिपळूण वन विभाग व दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी (३० डिसेंबर) सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घोणसरे (ता. चिपळूण) येथील चिवेली फाटा येथे केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रामपूर नियतक्षेत्रातील घोणसरे येथील चिवेली फाटा येथे काहीजण वन्यप्राण्याची कातडी अवैध तस्करी व विक्रीच्या उद्देशाने घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे वन विभाग व दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचला होता. त्याठिकाणी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान संशयितरित्या वावरणाऱ्या तिघांकडे चौकशी केली. त्यांच्याकडे असणाऱ्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये पट्टेरी वाघाचे कातडे मिळाले. या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक धनजंय कुलकर्णी, विभागीय वन अधिकारी दि. पो. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या संयुक्त कार्यवाहीमध्ये दहशतवाद विरोधी पथकाकडून पोलिस उपनिरीक्षक व्ही. के. नरवणे, वनपाल डी. आर भोसले, गुहागरचे वनपाल एस. व्ही. परशेट्ये, रामपूरचे वनरक्षक शिंदे, आबलोलीचे वनरक्षक डुंडगे, रानवी वनरक्षक मांडवकर यांच्यासह दहशतवाद विराेधी पथकाच्या अंमलदारांनी सहभाग घेतला हाेता