बिलासाठी नदी पार करण्याची वेळ

By admin | Published: March 30, 2016 10:33 PM2016-03-30T22:33:52+5:302016-03-31T00:02:18+5:30

रत्नागिरी-सातारा सीमा : अनेक गावे अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित

The time for the bill to cross the river | बिलासाठी नदी पार करण्याची वेळ

बिलासाठी नदी पार करण्याची वेळ

Next

श्रीकांत चाळके -- खेड -रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील १३ गावे अद्याप अविकसित आहेत. या खोऱ्यातील दुर्गम भागात वसलेल्या चकदेव, शिंदी, वळवण, मोरणी, आरव, महाळुंगे, कांदाट सालोशी, उचाट, वाघवळे, लामज, निवळी, आकल्पे आदी गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. स्वातंत्र्यानंतर आजही हा भाग अविकसित आहे. एवढंच नाही तर वीजबिल भरायचे असेल, तरीही कोयना नदी पार करावी लागते, ही येथील ग्रामस्थांची मुख्य समस्या
आहे.
दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये वसलेल्या कांदाटी खोऱ्यात चकदेव, शिंदी, वळवण, मोरणी, आरव, महाळुंगे, कांदाट सालोशी, उचाट, वाघवळे, लामज, निवळी, आकल्पे आदी गावे वसलेली आहेत. यापैकी शिंदी व उचाट येथे पोस्ट कार्यालय आहे. मात्र, तेथे वीजबिल भरण्याची सोय नाही. यामुळे येथील ग्राहकांना वीजबिल भरणा करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील तापोळा येथे जावे लागते. तेथे जाताना ग्रामस्थांना कोयना धरणाचे बॅकवॉटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसागर जलाशयातील जलमार्गाचा वापर करावा लागतो.
येथील वीज ग्राहकांच्या मीटरचे रिडिंगदेखील वेळेवर होत नसल्याने वीजबिलेही उशिरा म्हणजेच मुदत संपल्यानंतर मिळतात. त्यामुळे येथील ग्रामस्थांना जादा भुर्दंड सोसावा लागतो. खेड तालुक्यातील चकदेव येथील वीज ग्राहकांचे मीटर रिडिंग सहा महिन्यांतून एकदा घेतले जाते. ते किमान महिन्यातून एकदा घ्यावे, अशी येथील ग्राहकांची मागणी आहे. तसेच चकदेवला जाणारी महावितरणची मुख्य वाहिनी व लोखंडी पोल पूर्ण गंजलेल्या अवस्थेत आहेत. ते धोकादायक असून, कधीही खाली पडू शकतात.़ यामुळे पावसाळ्यापूर्वी हे गंजलेले पोल बदलणे गरजेचे आहे. पावसाळ्यात वीज गेल्यानंतर येथील ग्रामस्थांना ७ ते ८ दिवस अंधारात राहावे लागते.
या ठिकाणी येणारा रस्ता कच्चा असल्यामुळे एस. टी. बस बिघडली तर दुसरी बस येईपर्यंत ताटकळत बसावे लागते. या परिसरात भ्रमणध्वनी जवळपास बंदच असतो. संपर्क साधण्यासाठी याशिवाय इतर मार्गही नाही. तरीही दूरध्वनीवर इथल्या जनतेला अवलंबून राहावे लागते. काही वेळेला दूरध्वनीही क्वचितच लागतो. निसर्गदत्त देणगी लाभलेला परिसर असला तरी विकासापासून वंचित आहे. या परिसरातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी परिसरातील शिंदी व उचाट येथे किंवा मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच वाघावळे येथील पोस्टामध्ये वीजबिल भरणा केंद्र सुरू केल्यास ग्राहकांची गैरसोय दूर होईल. परिसरातील जंगलात काही ठिकाणी स्वयंभू महादेवाची जागृत स्थाने आहेत. तेथे ये-जा करण्यासाठी कोणताही मार्ग नाही.
रघुवीर घाटातून येथे जाण्यासाठी ३ तास अंतर पार करून जावे लागते, तोही डोंगरातून! पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या या स्थानांचा विकास न झाल्याने भाविकांपर्यंत या स्थानांची माहिती पोहोचू शकली नाही. अर्थातच याचा मोठा परिणाम येथील सर्वच व्यवहारावर होत आहे. शासनाने या परिसराकडील अविकसित सुविधांकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी यापूर्वी सातत्याने केली आहे. मात्र, या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. असुविधांनी ग्रस्त असलेल्या या गावांना मूलभूत सुविधा पुरविणे आवश्यक आहे.


गैरसोयी : शंभर रुपयांच्या बिलाला दुप्पट खर्च
मार्च महिन्यापासून कोयनेचे पाणी आटत असल्यामुळे तापोळा येथे जाण्यासाठी ग्रामस्थांना मैलोनमैल पायपीट करावी लागते. महावितरणचे १०० रूपयांचे बिल भरण्यासाठी दुप्पट गाडी खर्च करून तापोळा येथे जावे लागते. यामुळे येथील ग्रामस्थांच्या वेळेसह पैशांचाही अपव्यय होत आहे. तापोळा येथे जाऊन येण्यासाठी एक दिवस लागतो.


परिसराकडे आजही दुर्लक्ष
येथील सर्वच गैरसोेयी आणि असुविधांबाबत येथील ग्रामस्थांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मात्र, आजही या परिसराकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

Web Title: The time for the bill to cross the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.