उद्धव ठाकरेंना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न, भास्कर जाधव म्हणाले आता..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 06:29 PM2022-08-12T18:29:41+5:302022-08-12T18:30:08+5:30

आज शिवसेना वाईट परिस्थितीतून जात आहे. अनेकजण शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत.

Time for everyone to come together and stand firmly behind party chief Uddhav Thackeray with full strength says Bhaskar Jadhav | उद्धव ठाकरेंना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न, भास्कर जाधव म्हणाले आता..

उद्धव ठाकरेंना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न, भास्कर जाधव म्हणाले आता..

Next

चिपळूण : सध्या शिवसेनेचा संक्रमणाचा काळ सुरू आहे. पक्ष अडचणीत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशावेळी नेतृत्वासाठी वाद किंवा आपापसात हेवेदावे करण्यापेक्षा सर्वानी एकत्र येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने खंबीरपणे उभे राहाण्याची वेळ आहे, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.

गुहागर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील शिवसेनेच्या नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा काल, गुरुवारी शहरातील माटे सभागृह येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, माझ्या ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीच कोणाकडे मला अधिकार द्या, नेतृत्व करण्याची संधी द्या, अशी मागणी केली नाही. नेतृत्वासाठी कोणाच्या आड कधी आलो नाही. मी स्वतः माझे नेतृत्व सिद्ध केले आहे. यासाठी मला चिपळूणच कशाला राज्यात कोठेही मी लाथ मारीन तेथे पाणी काढीन हे सदानंद चव्हाण यांनाही माहिती आहे. त्यामुळे चिपळूणच्या नेतृत्वाचा सध्या कोणताही वाद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज शिवसेना वाईट परिस्थितीतून जात आहे. अनेकजण शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत. उध्दव ठाकरे यांना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

आता वादविवाद करण्याची, आपापसात गैरसमज करण्याची किंवा कोणतेही निमित्त शोधण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्र येऊन शिवसेना मजबूत करण्याची, शिवसेनेला लागलेले ग्रहण दूर करण्यासाठी जीवाचे रान करण्याची गरज आहे. पक्ष वाचविणे व मजबूत करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. भांडणासाठी, वाद करण्यासाठी संपूर्ण आयुष्य आहे. आताचा काळ कठीण असल्याने सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची वेळ आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

Web Title: Time for everyone to come together and stand firmly behind party chief Uddhav Thackeray with full strength says Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.