‘त्या’ कामगारांवर उपासमारीची वेळ
By admin | Published: January 1, 2015 10:19 PM2015-01-01T22:19:37+5:302015-01-02T00:08:37+5:30
स्वच्छ भारत अभियान : ३० कामगारांना ३ महिने पगार नाही
चिपळूण : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चिपळूण नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र, या मोहिमेमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या ३० कामगारांना ३ महिने होऊनही पगार न मिळाल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश दिल्यानंतर चिपळूण नगर परिषदेतर्फे आॅक्टोबर महिन्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विविध ठिकाणचा कचरा या अभियानाअंतर्गत उचलण्यात
आला. या कामासाठी ठेकेदारी पद्धतीने ३० कामगार २५ दिवसांसाठी घेण्यात आले होते. डिसेंबर महिना संपून जानेवारी आला तरी या कामगारांना अद्याप पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
यासंदर्भात संबंधित कामगारांनी मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. स्वच्छता अभियान राबवून या ३० कामगारांना केलेल्या कामाचा पगार मिळण्यासंदर्भात ठेकेदाराकडून चालढकल केली जात असल्याबद्दल नाराजीचा सूर आहे. ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या या कामगारांना नवीन वर्षात पगार मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)