कोरोना चाचणीच्या अहवालासाठी वेळेची मर्यादा रद्द करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:28 AM2021-04-19T04:28:28+5:302021-04-19T04:28:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना चाचणी अहवाल मिळण्यासाठी सकाळी ११ ते १२ व सायंकाळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना चाचणी अहवाल मिळण्यासाठी सकाळी ११ ते १२ व सायंकाळी ५ ते ७ अशी वेळ ठेवण्यात आली आहे. जिल्हाभरातून कोरोना चाचणीसाठी येणाऱ्यांना अहवाल प्राप्त होण्यासाठी तिष्ठत थांबावे लागते. त्यानंतर त्यांना गावी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाहन उपलब्ध हाेत नाही. त्यामुळे चाचणी अहवाल २४ तासांत प्राप्त व्हावेत, अशी मागणी संपर्क युनिक फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
परदेशात जाणाऱ्या नागरिकांना २४ तासांच्या आतच कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त होणे आवश्यक आहे. मात्र, अहवाल वेळेवर न मिळाल्याने परदेशात जाणाऱ्या नागरिकांचे विमान तिकीट वाया जात असून, केवळ वेळेत अहवाल प्राप्त होत नसल्याने २५ ते ५० हजारांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन वैद्यकीय तपासणी अहवाल तातडीने मिळण्याबाबत प्रयत्न करावा, अशी मागणी संपर्क युनिक फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.