यंदा केवळ चार ग्रामपंचायती निर्मल
By admin | Published: December 24, 2014 11:13 PM2014-12-24T23:13:44+5:302014-12-25T00:04:13+5:30
जिल्हा परिषद : तब्बल ८४ ग्रामपंचायतींची अजूनही योजनेकडे पाठ
रत्नागिरी : जिल्ह्यातील केवळ चार ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे़ मात्र, जिल्हा निर्मल होण्याच्या दृष्टीने पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे़ जिल्ह्यात लांजा आणि गुहागर हे २ तालुके निर्मल झाले असून, ७ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायती अजूनही निर्मल झालेल्या नव्हत्या. त्यासाठी या गावांमध्ये दत्तक-पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे अधिकारी ग्रामसेवकांच्या सहकार्याने त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये काम करणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक, आशा कार्यकर्ती आदींची मदत घेण्यात येणार आहे, असे मागील आॅक्टोबर महिन्यामध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी जाहीर केले होते़ जिल्हा निर्मल होण्याच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यात अजूनही १ लाख १० कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. या प्रत्येक शौचालयासाठी मग्रारोहयोतून ४६०० आणि नरेगामधून ५४०० असे एकूण १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे़ जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायती निर्मल होणे बाकी होते. त्यांच्यापैकी ८५ ग्रामपंचायती निर्मलग्राम पुरस्कारासाठी आॅनलाईन करण्यात आल्या होत्या़या ग्रामपंचायती निर्मल व्हाव्यात, यासाठी तेथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी जिल्हा परिषदेकडून कार्यशाळाही घेण्यात आली होती़ या कार्यशाळेच्या माध्यमातून निर्मलग्रामसाठी प्रबोधन करण्यात आले होते़दरम्यान, जिल्ह्यातील निर्मल ग्राम न झालेल्या ग्रामपंचायतींची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती आली होती़ या समितीने जिल्ह्यात दौरा करुन ग्रामपंचायतींची तपासणी केली होती़ त्यानंतर नुकताच राज्यातील ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे़ यामध्ये जिल्ह्यातील केवळ चार ग्रामपंचायतींना हा पुरस्कार मिळाला आहे़
जिल्ह्यातील आखणी काही ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती़ मात्र, अपेक्षा भंग झाल्याने जिल्हाभरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़
जिल्ह्यात ८४४ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींपैकी ७५६ ग्रामपंचायती यापूर्वीच निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये आणखी ४ ग्रामपंचायतींची भर पडल्याने त्यांची संख्या ७६० झाली आहे़ (शहर वार्ताहर)
योजनेची ऐशीतैशी
तालुकाग्रामपंचायतींची संख्या
मंडणगड१
दापोली१६
खेड१७
चिपळूण२७
संगमेश्वर७
रत्नागिरी९
राजापूर८
एकूण८५