खर्च भागवण्यासाठी दागिने विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2016 09:57 PM2016-03-27T21:57:56+5:302016-03-28T00:25:42+5:30

पर्ससीन नेट बंदी : मासेमारी हेच जीवन असणाऱ्या व्यावसायिकांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न

Time to sell ornaments to cover costs | खर्च भागवण्यासाठी दागिने विकण्याची वेळ

खर्च भागवण्यासाठी दागिने विकण्याची वेळ

googlenewsNext

रत्नागिरी : मासेमारी बंद असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली असून, पर्ससीन नेट नौकाधारक सोन्याचे दागदागिने विकून खलाशांचा पगार तसेच बँकांचे हफ्ते भरण्यासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या काही पिढ्यांपासून केवळ मासेमारी हाच एकमेव व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणारे मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे त्यांनी इतर व्यवसायाकडे किंवा नोकरी करण्याकडे न वळता आपल्या पुढील पिढीलाही मासेमारी या व्यवसायातच गुंतवून ठेवले. त्यामुळे आज केवळ मासेमारी व्यवसाय हेच जीवन आहे. त्यासाठी शासनाने ही बंदी घालताना भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करुन बंदी घालणे आवश्यक होते, असे पर्ससीन नेटधारक मच्छीमारांचे म्हणणे आहे.
या बंदीचा फटका मच्छिमारांव्यतिरिक्त इतर व्यावसायिकांनाही बसला आहे. आजची बाजारपेठेतील परिस्थिती पाहता इतर व्यवसायिकांचा निम्माही धंदा होत नाही. त्यामुळे पर्ससीन नेट मासेमारीवरील बंदी न उठवल्यास मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शेतकऱ्यांपेक्षा भयानक स्थिती मच्छीमारांची होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पर्ससीन नेटने मासेमारी पूर्णपणे बंद असल्याने अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या पर्ससीन नेट नौका मालकांना खलाशांचे हप्ते तसेच त्यांना द्यावा लागणारा महिन्याचा पगार भागवतानाही अडचणीचे ठरत आहे. तसेच नौका बंद असल्या तरी खलाशांच्या जेवणाचा खर्चही उचलावा लागत आहे. त्यामुळे अधिक अडचणीचे ठरत आहे.
वातावरणातील बदलामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पर्ससीन नेट मच्छीमारांवर शासनाकडून बंदी लादण्यात आल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे बँकांचे हप्तेही भरणा केलेले नाहीत. त्यासाठी पै-पै करुन आपल्या कुटुंबियांसाठी तयार केलेले सोन्याचे दागिनेही नौका मालकांनी विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस हे मासेमारी बंदचे संकट कायम राहिल्यास या आर्थिक अडचणीत सापडलेल्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
शिवाय शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्येशिवाय त्यांच्याकडे पर्यायही उरणार नाही, असेही काही मच्छिमारांचे म्हणणे आहे. त्यासाठी ही बंदी उठवण्याबाबत शासनाने लवकरात लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)


पर्ससीन नेटवर बंदी घातल्याने पारंपरिक मच्छीमारांच्या फायद्याचे ठरेल, असे वाटत होते. मात्र, त्यानंतर पारंपरिक मच्छीमार मोठ्या प्रमाणात मासेमारी करतील, ही अपेक्षा फोल ैठरली आहे.

पर्ससीन नेटवर अनेक संसार अवलंबून आहेत. या मच्छीमारीवर बंदी आल्याने हे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. याबाबत शासनाने त्वरित निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

गेली अनेक वर्षे पर्ससीन नेटने मच्छीमारी सुरु आहे. मग आताच बंदी का? व्यावसायिकांप्रती शासनाचे काहीच कर्तव्य नाही का? असा सवाल या मच्छीमारांनी उपस्थित केला आहे.

पर्ससीने नेट मासेमारीवर बंदी.
खलाशांचा पगार व इतर खर्च भागवणे मुश्किल.
कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मच्छीमारांकडे बँकांचा तगादा.
पिढ्यान्पिढ्या मासेमारीवरच अवलंबून.
कुटुंबियांच्या अंधारमय भविष्याने मच्छिमार चिंताग्रस्त.

Web Title: Time to sell ornaments to cover costs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.