रेशनवरील मोफत धान्याचे लाभार्थ्यांना वेळेत वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:21 AM2021-06-24T04:21:59+5:302021-06-24T04:21:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्य शासनाने लाॅकडाऊनच्या अनुषंगाने प्राधान्य आणि अंत्योदय घटकांना मे महिन्यात मोफत धान्य घेण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्य शासनाने लाॅकडाऊनच्या अनुषंगाने प्राधान्य आणि अंत्योदय घटकांना मे महिन्यात मोफत धान्य घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात या महिन्यात माेफत धान्याचे वितरण झाले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या मोफत धान्याचा लाभही या नागरिकांना मिळत असल्याने लाॅकडाऊन काळात या धान्याचा आधार ग्रामीण जनतेला होत आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्यभरात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात दुर्बल घटकांची उपासमार होऊ नये, या दृष्टीने राज्य शासनाने प्राधान्य आणि अंत्योदय घटकांना मे महिन्याचे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर केशरी कार्डधारकांना मे आणि जून या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामीण भागातील प्राधान्य आणि अंत्योदय घटकांना मे महिन्याचे धान्य वितरित करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेही या घटकांना मे ते नोव्हेंबर या कालावधीत पाच किलो धान्य (३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू, प्रति व्यक्ती) मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या लाभार्थ्यांना मे महिन्याचे धान्य वितरित करण्यात आले आहे.
लाॅकडाऊनच्या कठीण काळात अनेकांचे रोजगार बुडाले, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, या कालावधीत शासनाने या लोकांना मोफत धान्याचा हात दिला असल्याने या घटकांना आता शासनाच्या या योजनेचा लाभ चांगल्याप्रकारे होत आहे.
राज्य शासनाने मे महिन्याचे धान्य मोफत दिले. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे धान्य नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत दिले जाणार आहे. या दोन्ही योजनेचे मे महिन्याचे धान्य वितरित झाले आहे.
- ऐश्वर्या काळुसे, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी
धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा
जिल्ह्यातील ९४६ दुकानांवर ऑनलाईन धान्य वितरित होते.
पाॅस मशीनद्वारे धान्य देताना अंगठ्याचा ठसा घेतला जातो.
तरणात पारदर्शकता येण्यासाठी धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावावा.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आमचे छोटे-मोठे व्यवसाय थांबले आहेत. या परिस्थितीत हातात येणारा पैसाही थांबला आहे. मात्र, शासनाकडून दोन महिन्यांपासून मोफत धान्य मिळत असल्याने दिलासा मिळत आहे.
- संजय गुरव, नाणीज
कोरोनाने शेतीबरोबरच अन्य व्यवसायांचेही नुकसान केले आहे. अजूनही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. गरिबांची उपासमार होण्याची वेळ आली असतानाच, शासनाने गरिबांना मोफत धान्य देण्यास सुरुवात केली असल्याने कुटुंबाची उपासमार टळली आहे.
- संतोष जाधव, खानू
कोरोनामुळे लाॅकडाऊन जाहीर झाल्याने ग्रामीण जनतेचे अतिशय हाल झाले आहेत. त्यातच आता ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लाॅकडाऊन कडक करण्यात आले होते. मात्र, अशा संकटात शासनाने मोफत धान्य दिल्याने त्यावर कुटुंबाची गुजराण होत आहे.
- सुनील मोरे, पाली
डमी (स्टार - ८४०)