टायर फुटला, कार नदीत कोसळून तिघांचा मृत्यू; सात तासांनी मृतदेह बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 05:53 AM2018-06-28T05:53:22+5:302018-06-28T05:54:17+5:30
इनोव्हा कारचा टायर फुटून गाडी नदीत कोसळली आणि अकरा वर्षाच्या एका मुलासह त्याची आई आणि आजी यांचा बुडून मृत्यू झाला.
देवरूख/आरवली (जि. रत्नागिरी) : इनोव्हा कारचा टायर फुटून गाडी नदीत कोसळली आणि अकरा वर्षाच्या एका मुलासह त्याची आई आणि आजी यांचा बुडून मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे ही दुर्घटना बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. तब्बल सात तासांनी कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली. अपघात होतानाच कारमधून उडी मारणारा चालक बचावला आहे. ऋतुजा शैलेश पाटणे (वय ३४, रा. पनवेल), पियुष शैलेश पाटणे (११) आणि प्रमिला पद्माकर बेर्डे (५८, रा. चिपळूण) अशी मृतांची नावे आहेत.
संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील केळंबे येथे बारशाला गेलेले पाटणे कुटुंबीय आज बुधवारी सकाळी इनोव्हा कारमधून पनवेलच्या दिशेने परतत होते. नितीन लक्ष्मण वाघमारे (रा. नवी मुंबई, मूळ गाव सातारा) गाडी चालवत होता. धामणी येथे गाडीचा एक टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याच वेगात कार महामार्गाच्या बाजूने वाहणाऱ्या आसावी नदीतील महाडिकांचे बांधन येथे जाऊन कोसळली. गाडी बडत असल्याचे लक्षात येताच चालक वाघमारे यांनी दरवाजा उघडून उडी घेतली. त्याने आपल्यासोबतच आपल्या कडेला बसलेल्या पियुषला ओढून आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. तब्बल ७ तासांनंतर इनोव्हा कार अपघातस्थळापासून ५० फूट अंतरावरच सापडली. साडेसहा वाजता इनोव्हा बाहेर काढण्यात यश आले. पियुष, त्याची आई ऋतुजा आणि पियुषची आजी प्रमिला हे तिघेही गाडीतच होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता.