रत्नागिरीत देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 11:15 AM2024-03-10T11:15:41+5:302024-03-10T11:17:37+5:30
मंडणगड तालुक्यासाठी लवकरच नवीन एमआयडीसीची घोषणा करण्यात येईल असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक कामे करणे प्रस्तावित आहेत. या प्राधिकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कोकणात सागरी महामार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून त्याद्वारे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. रत्नागिरी येथे देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाच्या मेळाव्यात ते बोलत होते. कोकणातील माणसाला कोकणातच नोकरी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असून मंडणगड तालुक्यासाठी लवकरच नवीन एमआयडीसीची घोषणा करण्यात येईल असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
मंडणगड तालुक्यामध्येही ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होईल. कोकणात जलसंधारणाची कामे जास्त प्रमाणात झाली पाहिजेत असे निर्देश दिले आहेत. दरवर्षी कोकणातील जे ६५ टीएमसी पाणी वाहून जाते ते अडवण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली. राज्यातील महायुती सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे अनेक निर्णय घेतले असल्याचे मत यावेळी एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिर उभारणीचे आणि काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचे स्वप्न पूर्ण केले. गेल्या १० वर्षात आजवर कधीही घडले नाही एवढे काम केले. त्यांच्यामुळेच देश जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला. मोदींना साथ म्हणजे प्रगतीला साथ हे समीकरण असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचे हात भक्कम करा. तसेच महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून ४५हून अधिक उमेदवार निवडून आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.