बेदखलांसाठी आज आयुक्त जिल्ह्यात
By admin | Published: June 8, 2015 10:29 PM2015-06-08T22:29:38+5:302015-06-09T01:00:01+5:30
कुळांच्या समस्यांकडे लक्ष : समितीचा आजपासून दोन दिवसीय दौरा
रत्नागिरी : कोकणातील बेदखल कुळांच्या प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास करुन शासनाला शिफारस करण्याकरिता कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपेलवार यांची समिती उद्या, मंगळवारपासून दोन दिवस जिल्हा दौरा करणार आहे. विशेषत: यावेळी जमिनीला कूळ लावणे (७० ब) या दाव्यांमध्ये येणाऱ्या अडचणी ते जाणून घेणार आहेत.
कूळ कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली कूळ वहिवाट शाखेकडे दाखल झालेल्या दाव्यांमध्ये जमिनीला कूळ लावणे (७० ब), दिवाणी कोर्टाकडून तहसीलदारांकडे आलेले संदर्भ (८५ अ), कूळकायद्याच्या भंग झालेल्या प्रकरणान्वये सरकारजमा करण्यासंदर्भातील कारवाई (८४ क), घरभाट विक्री प्रकरण (१७ ब), कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची खरेदी किंमत निश्चित करणे (३२ ते ३२ र) या प्रमुख पाच प्रकारच्या दाव्यांचा समावेश होतो. या दाव्यांमध्ये जमिनीला कूळ लावणे (७० ब) चे दावे अतिशय क्लीष्ट ठरत आहेत. या दाव्यांमध्ये तहसील न्यायालय हे बेसीक न्यायालय असते. हे दावे लढण्यासाठी कुळांना वकील करण्यासाठी खर्च लागतो. तसेच कुळांना आपण कसत असलेल्या जमिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी खंडाची पावती द्यावी लागते. मात्र, जमीनमालक पावती देत नसल्याने दावा दाखल होताना अडचणी येतात. तसेच या दाव्यांमध्ये असलेली साक्षीदारांची संख्या, वारसतपास, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या तसेच अन्य तांत्रिक अडचणी यामुळे हे दावे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. यामुळे कूळ म्हणून नाव लागण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते.
या अनुषंगाने कोकण आयुक्त मोपेलवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती या दौऱ्यादरम्यान रत्नागिरी व सिंंधुदुर्र्ग जिल्ह्यांतील बेदखल कुळांच्या प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास करणार आहे. त्यांच्यासमवेत विश्वनाथ रामचंद्र पाटील, विक्रमगड, (जि. पालघर), गोपीनाथ झेपले, (देवरुख), दौलतराव पोस्टुरे, (मंडणगड), राजाभाऊ कातकर (रामपूर - चिपळूण), सुजित झिमण, (रत्नागिरी), सुरेश खापले, (वहाळ - चिपळूण) हे सदस्य आहेत.
दौऱ्याच्या वेळी समिती निवेदने, सूचना स्वीकारणार आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, बेदखल कुळे, सामाजिक संघटना यांनी आपली लेखी स्वरुपातील निवेदने, सूचना समितीला सादर कराव्यात. या गावभेटीच्या वेळी निवेदन देणे शक्य न झाल्यास विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन, महसूल शाखा पहिला मजला, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ या पत्त्यावर १५ जून २०१५ पर्यंत पाठवावीत, असे आवाहन कोकण विभाग उप आयुक्त (महसूल) यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
समितीचा सविस्तर दौरा
मंगळवार, ९ रोजी सकाळी ११ वाजता खेडशी, दुपारी ३.३० वाजता कोळंबे (ता. रत्नागिरी). बुधवार, १० रोजी सकाळी ११ वाजता कोसंबी, (ता. चिपळूण), दुपारी ३.३० वाजता मौजे असगोली (ता. गुहागर).