राजापूरचे आमदार राजन साळवींसह कुटुंबियांची आजची चौकशी पुढे ढकलली
By अरुण आडिवरेकर | Published: March 24, 2023 03:28 PM2023-03-24T15:28:37+5:302023-03-24T15:28:54+5:30
रत्नागिरी : ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी आज (२४ रोजी) होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात ...
रत्नागिरी : ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी आज (२४ रोजी) होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राजन साळवी हे अलिबाग लाचलुचपत विभागासमोर हजर राहणार नाहीत. दरम्यान, पुढील महिन्यात ३ किंवा ४ एप्रिल रोजी ही चौकशी होणार असून, त्यावेळी सर्वांना हजर व्हावे लागणार आहे.
राजन साळवी हे आज आपल्या कुटुंबासह अलिबाग एसीबीसमोर हजर राहणार होते. त्यासाठी ते मुंबईतून रो-रो सेवेने अलिबागला दाखल होणार होते. मात्र, एसीबी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे साळवी कुटुंबियांची चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे. ही चौकशी आता ३ आणि ४ एप्रिलला होणार आहे. अलिबागच्या एसीबी कार्यालयातून राजन साळवी यांना आज येऊ नका म्हणून फोन गेला. या फोनमुळे राजन साळवी व कुटुंबीय आज एसीबी चौकशीला सामोरे जाणार नाहीत.