जिल्ह्यात आजपासून सागरी मासेमारी सुरू
By admin | Published: August 1, 2016 12:21 AM2016-08-01T00:21:15+5:302016-08-01T00:21:15+5:30
बंदरे गजबजणार : हद्दीच्या बाहेर व्यवसायाला प्रारंभ
रत्नागिरी : गेल्या दोन महिन्यांपासून सागरी मासेमारीवर शासकीय बंदी होती. ही बंदी ३१ जुलै २०१६ रोजी संपुष्टात आली आहे. १ आॅगस्टपासून जिल्ह्यातील सागरी मासेमारी सुरू होणार असून त्यासाठी मासेमारी नौका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पर्ससीन मासेमारी नौकांनाही ठरवून दिलेल्या सागरी हद्दीच्याबाहेर मासेमारी करता येणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच मासेमारी बंदरे गजबजणार आहेत.
एकिकडे सागरी मासेमारीवरील शासकीय बंदी संपली असली तरी अद्यापही सागराचे रौद्र रुप पाहता सागर खवळलेला दिसून येत आहे. त्यातच पावसाचा जोरही कायम आहे. परिणामी १ आॅगस्टपासून मासेमारी सुरू होणार असली तरी ती अंशत:च राहील, असाही अंदाज व्यक्त होत आहे. मोठ्या मासेमारी नौका खोल सागरातील मच्छीमारीसाठी नारळी पौर्णिमेनंतरच जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातही पावसाचा जोर कमी झाला तर मोठ्या मासेमारी नौका सागरात मासेमारीस जाण्याचीही शक्यता मच्छीमारांमधून व्यक्त होत आहे. पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या अनेक छोट्या नौका आहेत. १० वावाच्या आतील सागरी क्षेत्रात या नौका मासेमारी करीत असल्याने या नौका १ आॅगस्टपासूनच मोठ्या संख्येने मासेमारीसाठी सागरात जाण्याच्या तयारीत आहेत. मासेमारीची सर्व सज्जता झाली आहे. पर्सनेट नौकांवरील खलाशीही गेल्या आठवड्यातच रत्नागिरीत दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)
घुसखोरी थांबणार?
गेल्या काही वर्षापासून कोकणच्या सागरी क्षेत्रात केरळ, तामिळनाडूतील मोठ्या क्षमतेच्या फिशिंग बोटी सातत्याने घुसखोरी करीत असल्याचे चित्र आहे. या बोटी कोकणच्या सागरी क्षेत्रातील माशांची मोठ्या प्रमाणात लूट करीत असल्याने ही समस्या कशी सोडविली जाणार याबाबत अद्यापही प्रश्नचिन्हच आहे. यंदा स्थिती काय राहणार याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत.
प्रजननासाठी किनाऱ्यावर आलेले मासे जाळ्यात!
रत्नागिरीसह जिल्ह्यात बाजारपेठांमध्ये छोटे व मोठे बांगडे, सुरमई विक्रीसाठी येत आहेत. छोट्या होड्यांमधून याआधीच समुद्राच्या, खाड्यांच्या भागात आधीच मासेमारी सुरू झाली आहे. या मासेमारीत बांगड्यांमध्ये अंड्यांचे प्रमाण अधिक आहे. अजून बांगडा प्रजननासाठी किनाऱ्यालगत आहे. मोठा बांगडाही जाळ्यांमध्ये सापडणार आहे.