आजच्या काळात राम-भरत संवाद महत्त्वाचा-चंद्रशेखर वझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 06:44 PM2021-02-19T18:44:04+5:302021-02-19T18:44:55+5:30
Kalidas Festival Ratnagiri- रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याकरिता राम आणि भरत यांच्यातील संवाद महत्त्वाचा आहे. आजच्या काळातही हा संवाद खूपच उपयुक्त असून, त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. रामाने राज्य कारभाराबाबत सूक्ष्म विचार केलेला दिसतो. राज्य हडप करण्याची इच्छा असणाऱ्या मंत्र्यांना आणि भ्रष्ट आचरण करणाऱ्यांना थारा करू नका, असा स्पष्ट आदेशच रामाने भरताला केला होता. त्यामुळे आजच्या काळातसुद्धा वाल्मिकी रामायण उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे कोकण प्रांताध्यक्ष चंद्रशेखर वझे यांनी केले.
रत्नागिरी : रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याकरिता राम आणि भरत यांच्यातील संवाद महत्त्वाचा आहे. आजच्या काळातही हा संवाद खूपच उपयुक्त असून, त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. रामाने राज्य कारभाराबाबत सूक्ष्म विचार केलेला दिसतो. राज्य हडप करण्याची इच्छा असणाऱ्या मंत्र्यांना आणि भ्रष्ट आचरण करणाऱ्यांना थारा करू नका, असा स्पष्ट आदेशच रामाने भरताला केला होता. त्यामुळे आजच्या काळातसुद्धा वाल्मिकी रामायण उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे कोकण प्रांताध्यक्ष चंद्रशेखर वझे यांनी केले.
गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात आयोजित कालिदास व्याख्यानमालेच्या समारोपाच्या व्याख्यानात अज्ञात रामायण या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले की, अपराध्यांना योग्य शिक्षा होते ना, कारण निरपराध लोकांचे अश्रू राजवंशाचाही नाश करतात. शिक्षासुद्धा गुन्ह्याच्या प्रमाणात असावी. रामाने विचारलेले प्रश्न आजच्या काळालाही लागू होणार आहेत. समाजहिताचे प्रकल्प द्रुतगतीने पूर्ण होतात ना, या विचारामध्ये पैसे आणि वेळेला महत्त्व दिले आहे.
अलीकडे सरकारचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होताना दिसत नाहीत. हेरखाते सज्ज असावे. आधी मंत्र्यांशी चर्चा करावी व नंतर सर्व मंत्रिमंडळात विषय मांडावा, आपल्या गोपनीय गोष्टी चार दोघांमध्ये स्थिर राहतात. पण तिसऱ्याला कळल्या तर पसरण्याची भीती असते. आपल्या देशाचा आणि विद्वान, सद्सद्विवेक बुद्धी असलेला राजदूत नेमावा. सैनिकांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे तरच त्यांची राज्याशी निष्ठा चांगली राहते, असे वझे म्हणाले.
अयोध्येत प्रभू श्री रामाचे मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. त्याला लोक सढळ हस्ते निधी देऊन हातभार लावत आहेत. त्याप्रमाणे मूळ वाल्मिकी रामायणातील रामराज्याची संकल्पना अभ्यासून समाजात रामाचे विचार पोहोचवण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन वझे यांनी केले.
प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी वझे यांच्या विवेचनाबद्दल अभिनंदन केले. संस्कृत विभाग सातत्याने चांगले उपक्रम राबवत आहे. रामराज्य अवतरण्यासाठी रामाचा विचार समाजात पोहोचवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे, असे सांगितले. सूत्रसंचालन स्नेहा शिवलकर यांनी केले. डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले.