चिपळूण वाशिष्ठी पुलाच्या लोकार्पणाचा मुहूर्त आज ठरणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:37 AM2021-09-04T04:37:52+5:302021-09-04T04:37:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : वाहतुकीसाठी सज्ज झालेल्या बहादूरशेख येथील नवीन वाशिष्ठी पुलाच्या लोकार्पणाचा मुहूर्त शनिवारी ठरणार आहे. त्यासाठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : वाहतुकीसाठी सज्ज झालेल्या बहादूरशेख येथील नवीन वाशिष्ठी पुलाच्या लोकार्पणाचा मुहूर्त शनिवारी ठरणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार प्रतिनिधीसह खासदार विनायक राऊत हे सकाळी याठिकाणी पाहणी करणार असून, पुलाचा अंतिम चाचणी अहवाल व दोन्ही बाजूचे जोडरस्ते याची पाहणी व चर्चा केल्यानंतर लोकार्पणाची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील महत्त्वाचा प्रकल्प मानला जाणाऱ्या चिपळूण बहादूरशेख येथील वाशिष्ठी नदीवरील पुलाचे बांधकाम आता पूर्णत्वाकडे गेले आहे. प्रत्यक्षात येथे १२-१२ मीटर रुंदीचे व २४७.५ मीटर लांबीचे दोन पूल आहेत. त्यापैकी एक पूल पूर्णतः तयार झाला असून, एकेरी वाहतुकीसाठी हा पूल सज्ज झाला आहे. जुन्या पुलावरून होणारी धोकादायक वाहतूक आता थांबणार आहे. परंतु, नवीन पुलावरून प्रत्यक्षात वाहतूक कधी सुरू होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता ही प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत.
या पुलाचे काम पूर्ण होऊन अंतिम तांत्रिक चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी या पुलावरून वाहतूक सुरू व्हावी, अशी खासदार विनायक राऊत यांची संकल्पना होती. त्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले होते. आता काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा खासदार राऊत पाहणी करण्यासाठी येत आहेत. शनिवारी खासदार राऊत चिपळूणमध्ये येत असून, राष्ट्रीय महामार्गाचे सर्व अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार प्रतिनिधी यांच्यासमवेत सकाळी ११ वाजता ते पुलाची पाहणी करून चर्चा करणार आहेत. पुलाचा तांत्रिक चाचणी अहवाल तसेच दोन्ही बाजूचे जोडरस्ते याची माहिती घेतल्यानंतर पुलाच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरवला जाणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे आगमन आता नवीन पुलावरून होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.