विधानपरिषदेसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:51 PM2018-05-20T22:51:26+5:302018-05-20T22:51:26+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र विधानपरिषद रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज, सोमवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ९४० मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. या निवडणुकीत राष्टÑवादीचे अनिकेत तटकरे व शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात थेट लढत होत आहे.
जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती तसेच नगर परिषदांचे नगरसेवक या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. यासाठी रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील मिळून एकूण १६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या तीनही जिल्ह्यांतील उपविभागीय कार्यालयात मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
त्यानुसार रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक ४६९, सिंधुदुर्गमधील २१२ व रत्नागिरीतील २५९ मतदार येत्या २१ रोजी हक्क बजाविणार आहेत. मतदान २१ मे २०१८ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत घेण्यात येईल. मतमोजणी २४ मे २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत कार्यालयात तीनही जिल्ह्यांसाठी एकत्रित होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी पूर्ण झाली आहे.
मतपत्रिकेद्वारे मतदान
मतदान मतपत्रिकेद्वारे होणार असून, प्रत्येक केंद्रावर एक मतपेटी राखीव ठेवण्यात येणार आहे. २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृहात तीनही जिल्ह्यांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर एकत्रित मतमोजणी होणार आहे.
मतदान केंद्र (प्रांत कार्यालये, १६) : रत्नागिरी (५) - दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर. सिंधुदुर्ग (३) - कणकवली, कुडाळ, सावंतवाडी. रायगड (८) - पनवेल, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, महाड
तीन जिल्ह्यांत मतदार
महाराष्ट्र विधानपरिषद रायगड - तथा - रत्नागिरी तथा -सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी या तीन जिल्ह्यांतील एकूण ९४० मतदार मतदानासाठी पात्र आहेत. पैकी रत्नागिरीचे २५९, सिंधुदुर्गातील २१२ आणि रायगडचे ४६९ मतदार आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक मतदार
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांचे एकूण १६४ सदस्य, पंचायत समित्यांचे ३२ सदस्य व नगरसेवक ७४४ मतदान करणार आहेत.
स्त्री-पुरुष मतदार संख्या (जिल्हानिहाय)
जिल्हा स्त्री पुरुष
रत्नागिरी १३१ १२८
सिंधुदुर्ग ७२ १४०
रायगड २३८ २३१
एकूण ४४१ ४९९