ग्रामीण साहित्य संमेलन आजपासून
By admin | Published: January 29, 2016 09:53 PM2016-01-29T21:53:30+5:302016-01-30T00:13:11+5:30
पाचल येथे आयोजन : स्वातंत्र्यसैनिक गोपाळ नारकर साहित्यनगरी सजली
वाटूळ : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई व ग्रामपंचायत, पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० व ३१ जानेवारी असे दोन दिवस दुसरे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसैनिक गोपाळ नारकर साहित्यनगरीत ग्रामीण साहित्य संमेलनाची रेलचेल सुरु झाली आहे.सरस्वती विद्यामंदिर, पाचल येथील वाडिया सभागृहाला साहित्य नगरीचे स्वरुप आले आहे. ग्रामीण कवी संमेलन, पुस्तक प्रदर्शन, जीवन गौरव पुरस्कार यांचे वितरण यावेळी होणार आहे. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बालसाहित्यिक मदन हजेरी यांची निवड झाली असून, स्वागताध्यक्षपदी सिद्धार्थ जाधव यांची निवड झाली आहे. ध्वजारोहण सरपंच अपेक्षा मासये यांचेहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक मनोहर खापणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शांताराम पाटकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. संमेलनामध्ये ग्रामीण साहित्यकार अप्पासाहेब खोत यांची ‘ग्रामीण कथा’, रमेश कदम ‘ग्रामीण सांस्कृतिक साहित्य’ तसेच नामदेव, खामकर ‘फुले, शाहू, आंबेडकर चळवळ’, प्राचार्य व्ही. के. खाडे हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ग्रामीण विकास’ या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुरु होणाऱ्या साहित्य संमेलनाचा समारोप, दि. ३१ जानेवारी रोजी १२.३० वाजता होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय कामगार नेते अॅड. सदानंद शेट्ये, अजित यशवंतराव, अॅड. सुरेश मोरे, सिद्धाली मोरे, महिला व बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, पंचायत समिती सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी रबसे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, दत्ता कदम, तुकाराम शिंदे, गणपत शिर्के, कुंडलिक अघाटे उपस्थित राहणार आहे. (वार्ताहर)