जाधवांच्या मतदारसंघात आज वायकरांचा दरबार
By admin | Published: February 25, 2015 09:53 PM2015-02-25T21:53:33+5:302015-02-26T00:15:07+5:30
गुहागर पंचायत समितीसह गुहागर नगरपंचायत राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व असल्याने जनता दरबारामध्ये कोणते प्रश्न मांडले जातात, हा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.
गुहागर : पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर पहिल्यांदाच उद्या (दि. २६) सकाळी १० वाजता गुहागर तालुका जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेची गाऱ्हाणी ऐकणार आहेत. राष्ट्रवादीचे भास्कर जाधव या मतदारसंघाचे आमदार आहेत. गुहागर पंचायत समितीसह गुहागर नगरपंचायत राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व असल्याने जनता दरबारामध्ये कोणते प्रश्न मांडले जातात, हा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या गुहागर मतदारसंघाच्या फेररचनेनंतर शिवसेना व भाजप यांच्या भांडणात राष्ट्रवादीकडे गेला. या विधानसभा निवडणुकीमध्ये युती न झाल्याने तीच स्थिती असून, भास्कर जाधव ३५ हजारांच्या मोठ्या फरकाने निवडून आले. राज्यमंत्री, पालकमंत्री व कॅबिनेटमंत्री म्हणून काम करताना भाजपच्या ताब्यातील गुहागर पंचायत समितीसह बराच काळ वादाचा विषय ठरलेली गुहागर नगरपंचायतही राष्ट्रवादीकडे एकतर्फी संख्याबळाने गेली. पराजित झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम व यावेळी शिवसेनेचे उमेदवार विजय भोसले या मतदारसंघात पुन्हा फिरकले नाहीत. डॉ. विनय नातूंनीही निवडणूक वगळता राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत केले.शिवसेनेचे खासदार व सध्याचे उद्योगमंत्री यांचा या मतदारसंघाशी फारसा संपर्क नाही. शिवसेनेमध्ये गीते व रामदास कदम गट निर्माण झाल्याने शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना पालकमंत्री पद देण्यात आल्याची चर्चा आहे. यावेळी वायकर भास्कर जाधव यांच्या विरोधात कशा प्रकारे राजकीय आक्रमकता दाखवतात, गीते व कदम गट रोखण्यासाठी वायकरांची निवड केलेली असताना यावेळी सर्व शिवसेना कार्यकर्ते एकदिलाने काम करताना दिसतात का? येथील भाजप कार्यकर्त्यांशी कशा प्रकारे संवाद साधतात? अशा अनेक राजकीय बाबी वायकर यांच्या गुहागर दौऱ्यातून स्पष्ट होणार असल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. (प्रतिनिधी)