मजुरांना पर्याय ठरताहेत अवजारे, यंत्रसामग्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:33+5:302021-09-16T04:39:33+5:30
रत्नागिरी : भात शेती करताना पिकाच्या मशागतीची बहुतांश कामे निसर्गाच्या लहरीपणामुळे अथवा शेतमजुरांची उपलब्धता न झाल्याने वेळेवर होत नाही. ...
रत्नागिरी : भात शेती करताना पिकाच्या मशागतीची बहुतांश कामे निसर्गाच्या लहरीपणामुळे अथवा शेतमजुरांची उपलब्धता न झाल्याने वेळेवर होत नाही. पर्यायाने प्रति हेक्टर उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होते. भात शेतीची मशागत ही कष्टाची, वेळखाऊ व खर्चिक झाली आहे. भात उत्पादनाच्या एकूण खर्चापैकी ४८ टक्के खर्च हा निव्वळ मजुरीवर होतो. खर्च कमी करण्यासाठी वेळेवर व जलद मशागत करण्यासाठी विविध अवजारांचा व यंत्राचा वापर करणे फायदेशीर ठरते.
नांगरणी, चिखलणी, पेरणी, लावणी यंत्रे उपलब्ध आहेत. याशिवाय कोळपणी, भात कापणी व मळणी यंत्रेही उपलब्ध आहेत. भात पिकातील तण नियंत्रणासाठी मनुष्याद्वारे तण काढण्यास हेक्टरी २५ ते ३० मजूर लागतात; परंतु हेच काम जर जपानी भात कोळपे अथवा कोनोविडरने केले तर १५ ते १७ मजुरात एक हेक्टर क्षेत्राची बेणणी होऊ शकते; परंतु ही पद्धत फार काबाडकष्टाची व वेळखाऊ आहे. तणनियंत्रणासाठी कोनोविडर, जपानी विडर फार उपयुक्त आहेत.
भात पिकातील तण नियंत्रणाकरिता १३० मी. मी. रुंद कोनोविडर विकसित करण्यात आले आहे. या अवजाराला दोन शंकू आकाराचे दातेरी कोन दिलेले असून, भात रोपांचे ओळीत चालवताना विडरचे वजन सांभाळण्याकरिता फ्लोट दिलेला आहे. हे अवजार मनुष्याद्वारे चालविण्यासाठी दोन दांड्यांचा आधार असलेले लांब हॅण्डल दिले आहे. कोनोविडर चालविणाऱ्या व्यक्तीच्या उंचीनुसार हॅण्डलची उंची कमी जास्त करण्याची सोय आहे. कोनोविडर भात रोपांचे ओळीत चालवताना वजन फ्लोटरवर घेऊन कोनोविडर फक्त पुढे ढकलत दोन्ही कोन टेकवत चालवावे लागतात. कोनाेविडरचा वापर करताना भात खाचरात कमीत कमी पाच ते सहा सेंटीमीटर पाणी आवश्यक असते. कोनोविडरचा वापर करून भात खाचरातील तणाचे नियंत्रण तसेच खत मातीत गाडणे शक्य होते. कोनोविडरचा वापर केल्यास ५० ते ६० टक्के वेळ व तण नियंत्रण खर्चाच बचत होते. कोनोविडरचा वापर करून ताशी ८ ते १० गुंठे क्षेत्रावरील तणाचे नियंत्रण करता येते.
भात कापणी अवजारे
कापणीयोग्य झालेल्या भात पिकाची कापणी विळा (मनुष्यबळाने), रिपर, (ट्रॅक्टरचलित किंवा पाॅवरटलरचलित) किंवा कम्बाईन हार्वेस्टर यांच्या सहाय्याने केली जाते. भात पिकाची कापणी जमिनीच्या लगत करणे आवश्यक असते. त्यामुळे भात खाचरात खोडाचा कमी भाग राहून खोड किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. कापणी करत असताना भात पीक व्यवस्थित हाताळणे आवश्यक असते की, जेणेकरून तयार झालेले भात (भाताच्या लोंब्या) जमिनीवर गळून पडणार नाहीत. कापणी खर्चात बचत होते.
वैभव विळा
या विळ्याचे वजन १७५ ग्रॅम असून, कापण्यास उपयुक्त. पात्याची लांबी १५ सेंटीमीटर आहे. तसेच पाते दातेरी आहे. वैभव विळ्याच्या पात्यास त्याच्या वापराबरोबरच धार येत राहते. त्याला धार लावण्याची आवश्यकता भासलीच तर पात्याच्या पाठीमागच्या बाजूस कानसीने घासून धार लावता येते. खोडकिड्याचा प्रादूर्भाव आहे, अशा ठिकाणी हा विळा वापरला गेल्यास खोडकिड्यांचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
स्वयंचलित कापणी यंत्र
स्वयंचलित कापणी यंत्राव्दारे भाताचे पक्व झालेले पीक कापता येते. कापणीसोबतच पीक एका बाजूला अंथरल्यामुळे पेंढ्या बांधणीचे काम सोपे होते. या यंत्रावर ३.५ अश्वशक्तीचे इंजिन बसविले असून, त्याद्वारे कापणी यंत्रणेला शक्तीचे संक्रमण होते. या यंत्राद्वारे दिवसाला तीन एकर क्षेत्रावर कापणी करता येते. यंत्र डिझेलचलित व पेट्रोल -केरोसीनचलित अशा स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे मजुरीचा खर्च ५० टक्के कमी होतो.
रिपरचा वापर
पाॅवर टिलरचलित रिपरद्वारे भाताचे तयार झालेले पीक कापून एका सरळ रेषेत टाकण्याचे काम यामुळे केले जाते. पाॅवरटिलरच्या शक्तीवर चालत असून, यासाठी पाच अश्वशक्तीच्या डिझेल इंजिनची गरज भासते. या यंत्राच्या सहाय्याने ताशी ०.२ हेक्टर क्षेत्रावरील भात कापणी केली जाते, तसेच तासी ०.८० लिटर डिझेलची आवश्यकता भासते. ट्रॅक्टरचलित रिपरच्या वापरामुळे ६० ते ७० टक्के मनुष्यबळ वाचते.