अवजारे वाचवतात खर्च आणि वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:36 AM2021-09-23T04:36:03+5:302021-09-23T04:36:03+5:30
रत्नागिरी : पारंपरिक मळणीच्या पध्दतीमध्ये तयार झालेल्या भाताच्या पेंढ्या लाकडी ओंडक्यावर किंवा लोखंडी पत्र्याच्या ड्रमवर आपटल्या जातात. ही पध्दत ...
रत्नागिरी : पारंपरिक मळणीच्या पध्दतीमध्ये तयार झालेल्या भाताच्या पेंढ्या लाकडी ओंडक्यावर किंवा लोखंडी पत्र्याच्या ड्रमवर आपटल्या जातात. ही पध्दत फारच काबाडकष्टाची व वेळखाऊ आहे. भाताच्या मळणी यंत्रामध्ये प्रामुख्याने पाय मळणी यंत्रे, इलेक्ट्रिकल मोटारवर चालणारे मळणी यंत्र यांचा समावेश आहे. मनुष्यबळाद्वारे झोडणी आणि वारवणेकरिता ३५ ते ४० मनुष्य प्रतिहेक्टरी लागतात. परंतु मनुष्यचलित अथवा पाॅवर थ्रेशरने मळणी केली तर ६० ते ७० टक्के खर्चाची बचत होऊन वेळेत मळणी होत असल्यामुळे पिकाचे नुकसान टाळता येते.
या व्यतिरिक्त इतर कामेसुध्दा यंत्राव्दारे करता येतात. कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा तणनाशक यांची फवारणी, जमिनीची ट्रॅक्टर किंवा पाॅवर टिलरव्दारे मशागत आदि यंत्राव्दारे सर्व कामे केल्यास वेळेत कामे पूर्ण होऊन, खर्चात तर बचत होते शिवाय पिकाच्या उत्पादनातसुध्दा वाढ होण्यास मदत होते.
परंतु शेतीचे यांत्रिकीकरण करताना योग्य त्या अवजारांची निवड करताना पाॅवर ट्रिलर, ट्रॅक्टर अथवा बैलांच्या क्षमतेनुसार करणे आवश्यक आहे. यामुळे इंधन व इतर खर्चात कपात करून यंत्राचा वापर कार्यक्षमपणे होऊ शकतो. त्याचप्रमाणे संकरीत भात उत्पादनात जर मशागत व आंतरमशागतीचे कामे वेळेवर होऊ शकली नाहीत तर त्याचा उत्पादनावर वाईट परिणाम होतो. आधुनिक भात शेतीचे यांत्रिकीकरण होणे आवश्यक आहे. सुधारित शेती अवजारांच्या उपयोगामुळे कमीत कमी आवक स्रोत वापरून जास्तीत जास्त उत्पन्न मिळते. जर कमीत कमी ऊर्जा वापरून योग्य वेळी ही अवजारे शेती उत्पादनासाठी वापरली तर त्याचे जास्त फायदे आहेत. परंपरागत साधनांच्या तुलनेत सुधारित अवजारांबरोबर सुधारित व्यवस्थापन वापरले असता २५ ते ३० टक्के ऊर्जा खर्च प्रतिटन कमी होऊ शकते. ट्रॅक्टर व पशू बळ यांच्या पूरकतेने जर शेती उत्पादन केले असता उर्जा आवक व खर्च कमी करता येतो. शेती कामासाठी यांत्रिकीकरणाव्दारे लागणारा वेळ, कामाचा दर्जा व ऊर्जा आवक व खर्च कमी करता येतो. सुधारणा केल्यास कार्यक्षमता सुधारते.
कंबाईन हार्वेस्टर
भात शेतीमधील कापणी व मळणीचे काम हे एकत्रितरित्या करण्याकरिता कंबाईन हार्वेस्टरचा वापर आज प्रामुख्याने करण्यात येत आहे. या यंत्राच्या सहाय्याने भाताची कापणी व मळणी ही एकाच वेळेला होऊन मळणी केलेला भात पुढील प्रक्रियेकरिता पाठविता येतो. याव्दारे पेंढ्याचे तुकडे होतात. कुकजे कंबाईन या यंत्राव्दारे पेंढ्याचे तुकडे होत नाही. या यंत्राव्दारे एका वेळेस तीन किंवा चार ओळी भाताची कापणी करून मळणीकरिता पाठविला जातो व भाताची मळणी हाेऊन संपूर्ण पेंढा जमिनीवर पडतो.
उत्पादन, उत्पादकता वाढ
सुधारित अवजारांचा भात उत्पादनासाठी उपयोग हा उत्पादन व उत्पादकता या दोन्हीमध्ये निश्चित वाढ करतो. उपलब्ध उच्च क्षमतेची मळणी यंत्रे वापरताना भाताचा अखंड पेंढा मिळत नाही. पेंढ्याचे तुकडे होतात. आपल्या भागात भाताच्या अखंड पेंढ्याला खूप महत्त्व असल्यामुळे उच्च क्षमतेच्या मळणी यंत्राच्या वापरावर मर्यादा येतात. कमी किमतीच्या पायाने चालणाऱ्या भात मळणी यंत्राचा वापर काही ठिकाणी करण्यात येतो.
भात मळणी यंत्र
भात मळणी करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले विद्युत मोटारचलित भात मळणी यंत्रांचा वापर केल्यास स्वच्छ धान्यासोबतच भाताचा अखंड पेंढा मिळतो. इनव्हर्टेड चेन प्रकारचा कनव्हेअर असलेले हे मळणी यंत्र वापरल्यास भाताची मळणी होऊन ताशी २०० किलोपर्यंत स्वच्छ धान्य मिळते. या मळणी यंत्रामध्ये सिंगल फेजवर चालणारी २ अश्वशक्तीची विद्युत मोटार दिलेली असून, जलद मळणी करता येते.
कष्टाचे काम टाळता येते
भात मळणी कमी वेळेत व कमी खर्चात होते. पायाने चालणाऱ्या मळणी यंत्रापेक्षा अत्यंत कार्यक्षम असून, उफणणी करावी लागत नाही. मळणीला खर्च कमी येतो. भाताचा अख्खा पेंढा मिळतो. मळणी करताना ड्रममध्ये कापलेले पीक धरून ठेवावे लागत नाही. फलाटवरून पीक आपोआप पुढे सरकवले जाते. मळणीची क्षमता ९७ ते ९८ टक्के असून धान्य स्वच्छ करण्याची क्षमता ९८ ते ९९ टक्के आहे. यंत्राची क्षमता दोन क्विंटल आहे.