दडी मारलेल्या पावसाची संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:10+5:302021-07-12T04:20:10+5:30
रत्नागिरी : गेले १५ दिवस दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळपासून चांगलाच जोर धरला आहे. सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा ...
रत्नागिरी : गेले १५ दिवस दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळपासून चांगलाच जोर धरला आहे. सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रखडलेली शेतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९४८०.६० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७०४.३९ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस जिल्ह्यात खेड तालुक्यात झाला आहे.
पावसाने सलग दोन आठवडे विश्रांती घेतल्याने शेतीची कामे रखडली होती. लावलेली शेती उन्हाच्या कडाक्यामुळे वाळू लागली होती. मात्र, दि. ८ जुलैपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाल्याने शेतीची कामे सुरू झाली आहेत. सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे हवेमध्येही गारठा निर्माण झाला आहे. नदी, ओढ्यांच्या पाण्याच्या पातळीमध्येही वाढ झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यात कुठेही पडझड अथवा जीवितहानी झाल्याची प्रशासनाकडे अद्याप नोंद नाही.
जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आतापर्यंत १०२१.७०, दापोली ७५२.६०, खेड १४६७.३०, गुहागर ११४९.६०, चिपळूण ९८०.९०, संगमेश्वर १०१८.९०, रत्नागिरी ११९३.५०, लांजा ९९४, राजापूर तालुक्यात ९०२.१० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.