संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे कासवाच्या अनेक पिल्लांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 01:58 PM2020-03-11T13:58:00+5:302020-03-11T14:21:57+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ कासव संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जाळीत अडकून मृत्यू झाल्याचे खळबळ उडाली आहे. या केंद्रातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे कासव संवर्धन केंद्रच कासवांच्या पिल्लांना किती असुरक्षित बनले आहेत हे वास्तव उघड झाले आहे.
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ कासव संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जाळीत अडकून मृत्यू झाल्याचे खळबळ उडाली आहे. या केंद्रातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे कासव संवर्धन केंद्रच कासवांच्या पिल्लांना किती असुरक्षित बनले आहेत हे वास्तव उघड झाले आहे.
महाराष्ट्र शासन वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील आॅलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांची अंडी दाभोळ कासव संवर्धन केंद्रात संवर्धित केली जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कासव संवर्धन मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली जात असतानाच दाभोळ कासव संवर्धन केंद्रात निष्काषजीपणामुळे कासवांची अनेक पिल्ले मरण पावल्याचा प्रकार पुढे आला आहे. कासव संवर्धनासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु खरोखरच यातून संवर्धन होतेय का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
कासवांची अंडी संरक्षित केली जातात आणि जेव्हा त्यातून पिल्ले बाहेर येतात, तेव्हा त्यांना समुद्रात सोडले जाते. मात्र दाभोळ येथे अनेक पिल्ले संवर्धन केंद्राने घातलेल्या जाळ्यात अडकून मरण पावली आहेत. दाभोळ येथे आलेल्या काही संवेदनशील पर्यटकांनी जाळ्यातून बाहेर पडणाऱ्या कासवांचा व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल केल्यामुळे हा प्रकार पुढे आला.
हा व्हिडिओ तयार केला गेला, तेव्हा तेथे कासव संवर्धन केंद्राचा कोणीही कर्मचारी नव्हता. त्यामुळे अनेक कासवे अर्धमेल्या अवस्थेत जाळ्यात अडकून होती. या प्रकारातील दोषींवर तातडीने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा केली जात आहे.