फेरफटका - मुलं घडवणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:27 AM2021-04-03T04:27:14+5:302021-04-03T04:27:14+5:30
अनौपचारिक गप्पांतून सहावीच्या मराठी विषयातील ‘चवदार तळ्याचे पाणी’ ही छोटीशी कविता घेऊन मी मुलांशी बोलू लागलो. त्या मुलांना अनेक ...
अनौपचारिक गप्पांतून सहावीच्या मराठी विषयातील ‘चवदार तळ्याचे पाणी’ ही छोटीशी कविता घेऊन मी मुलांशी बोलू लागलो. त्या मुलांना अनेक गोष्टींचा अर्थ समजला नाही, असं समजलं. उदाहरण सांगतो - मुलांना विचारलं की, कवयित्री आपल्या कवितेत करुणा हा शब्द कशासाठी वापरतात? तिसरीतल्या चिनूने उत्तर दिले की करुणा म्हणजे कोरोना, तर सातवीतल्या पवनने सांगितले की, करुणा म्हणजे करु नका आणि ऋग्वेदने सांगितले की, कोरोना करु नका. मला खूप आश्चर्य वाटले. मुलांना कवितेचा अर्थच समजला नाही. परंतु, त्यांनी कवितेखाली दिलेल्या स्वाध्यायाची उत्तरे मात्र अगदी बरोबर सोडवली होती. मग मी विचारलं की, ‘ऋग्वेद तू ही उत्तरे कशी लिहिलीस’, तर तो म्हणाला की, ‘स्वाध्यायमालेतील उत्तरावरून मी ती उत्तरे लिहिली.’ मला कळले की मुलांनी कवितेचा अर्थ न समजून घेता उत्तरं लिहिली आहेत. बहुतेकवेळा शाळेमध्ये असेच घडते आणि मुलांच्या कोणत्याही बौद्धिक क्षमतेचा विकास होत नाही.
दुसरी गोष्ट, त्या कवितेत परंपरा हा शब्द होता. मी मुलांना विचारलं की, परंपरा म्हणजे काय? तर पवनने उत्तर दिलं की, परंपरा म्हणजे कुटुंब. बाकीच्यांनीही त्याचीच री ओढली. मग त्यांना सविस्तर सांगायला सुरुवात केली की, तुम्ही आता याच आठवड्यात होळी केली. होळीची परंपरा आहे. मग होळी का केली, तसा चिनू म्हणाला, ‘होळी जाळण्यासाठी केली.’ मग काय? जाळलं तर झाडं जाळली. मग झाडं जाळून तुम्हाला काय? मिळालं? काही नाही आनंद मिळाला. मग ही होळीची परंपरा जाळून आनंद घेण्यात आहे? का? असं विचारलं तर मुलं गप्प बसली. मग मुलांना मी प्रश्न विचारला की, आपण का जेवतो. मुलं म्हणाली भूक लागते म्हणून. आपण आंघोळ का करतो, अंग स्वच्छ ठेवावं म्हणून. दात का घासतो, दात किडू नयेत म्हणून. याला जशी कारणे आहेत तशी परंपरेलाही काही कारणं आहेत. आपण सण-उत्सव साजरे करतो त्या पाठीमागे काय? परंपरा आहे? तर मुलांनी नकार दिला. मला काही कळायलाच मार्ग नाही. मग कवितेतील प्रत्येक शब्दांवर त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला, पण मुले या कवितेखालील प्रश्नोत्तरांव्यतिरिक्त काहीच बोलायला तयार नव्हती. त्यांना म्हटलं, घरीदारी किंवा मला कधी विचारलंत का, याचा अर्थ काय? आहे, हे म्हणजे काय? आहे? तर मुलांनी उत्तर दिलं, काहीच कुणालाही विचारलं नाही. मग ओमकार म्हणाला की, मला असं वाटतं की, सर, या लॉकडाऊनमध्ये आम्हाला शाळेमध्ये नीटसं शिकवणं झालं नसल्यामुळे आम्हाला काही कळेनासं झालं आहे. ठीक आहे? म्हटलं. आपण आता मागच्या इयत्तेमधील अभ्यास करूयात, म्हणून मी सहावीच्या मुलाला चौथीच्या पुस्तकासंदर्भात विचारलं, तेव्हा तो म्हणाला, माझ्या आता लक्षात काहीच नाही.
या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर नि मुलांच्या निरागस, कोवळ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की, ज्या पिढीला आपण घडवण्याचा ध्यास बाळगून काम करतो आहोत, खरंच ही पिढी घडणार आहे का? खरंच ह्या पिढीला सगळ्या गोष्टी समजणार आहेत का? खरंच शब्दांचे अर्थ त्यांना समजणार आहेत का? जर उमजणार नसतील तर मग आपण एवढा अट्टहास का बरं करतो. मुलांना शिकवणं, मुलांना घडवणं याचा अर्थ फक्त पुढच्या वर्गात घालणं, वह्यांची नुसती पानं भरून उत्तरे लिहायची, हा जर अभिप्रेत असेल, तर मुलं सक्षम कधी करणार आम्ही? घडवण्यासाठी मुळात मुलाच्या आतमध्ये डोकावून त्याला काय समजलं, काय उमजलं, हे पाहणे आवश्यक आहे, अन्यथा केवळ पोपटपंचीच होईल. मग लॉकडाऊन असो अगर नसो. म्हणून प्रत्येक मुलाला नवीन शैक्षणिक धोरणानुसार काय समजलं, काय उमजलं हे पाहण्याबरोबरच मुलं घडवणं गरजेचं आहे.
- गजानन पाटील