रत्नागिरीतील पर्यटन व्यवसाय संधी, वृद्धीवर भर द्यावा, पालकमंत्री उदय सामंतांनी दिल्या सूचना

By अरुण आडिवरेकर | Published: September 29, 2022 04:28 PM2022-09-29T16:28:27+5:302022-09-29T16:28:52+5:30

जिल्ह्यातील सद्यस्थिती जाणून घेऊन कामांच्या निकडीनुसार प्राधान्य क्रम ठरवावा आणि त्याप्रमाणे विहित कालावधीत योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या

Tourism business opportunities in Ratnagiri should be emphasized on growth, Instructions given by Guardian Minister Uday Samant | रत्नागिरीतील पर्यटन व्यवसाय संधी, वृद्धीवर भर द्यावा, पालकमंत्री उदय सामंतांनी दिल्या सूचना

रत्नागिरीतील पर्यटन व्यवसाय संधी, वृद्धीवर भर द्यावा, पालकमंत्री उदय सामंतांनी दिल्या सूचना

Next

रत्नागिरी : पर्यटन हा रत्नागिरी जिल्ह्याचा पाया आहे. त्या दृष्टीने पर्यटन व्यवसायाच्या संधी आणि पर्यटन वृद्धीवर भर द्यावा. त्या पार्श्वभूमीवर आंबा महोत्सवाचे अधिक व्यापक नियोजन करावे. तसेच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह सुविधायुक्त आणि सुसज्ज ठेवण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथी गृह येथे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासंदर्भातील विकासकामांची आढावा बैठक मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी यंत्रणा प्रमुखांना निर्देशित केले. बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, आयुक्त गणेश देशमुख, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीची जिल्ह्यातील सद्यस्थिती जाणून घेऊन कामांच्या निकडीनुसार प्राधान्य क्रम ठरवावा आणि त्याप्रमाणे विहित कालावधीत योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात यावे. तसेच यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करावे. जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी प्राधान्याने कृती कार्यक्रम राबवून सर्व कुपोषित बालकांची, त्यांच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोविडमध्ये पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना मंत्री सामंत यांनी केली.

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा निधी नियमानुसार विहीत कालावधीत वापरला जाईल, यासाठी खबरदारी घ्यावी. शिक्षण सुविधा बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदने विशेष लक्ष द्यावे. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी. अंगणवाडी, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, पाटबंधारे विभाग, आरोग्य, शिक्षण, नगरविकास, यासह जिल्ह्यातील विविध योजनांची अंमलबजावणी विहीत कालावधीत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या.

Web Title: Tourism business opportunities in Ratnagiri should be emphasized on growth, Instructions given by Guardian Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.