पर्यटन सुविधा अत्यावश्यक

By admin | Published: November 21, 2014 09:19 PM2014-11-21T21:19:12+5:302014-11-22T00:17:24+5:30

मिनी महाबळेश्वर दापोली : पायाभूत सोयीसुविधांवर भर देणे आवश्यक --रेंगाळलेलेप्रश्न

Tourism facilities are essential | पर्यटन सुविधा अत्यावश्यक

पर्यटन सुविधा अत्यावश्यक

Next

शिवाजी गोरे -दापोली तालुक्याला मिनीमहाबळेश्वर म्हणून ब्रिटिशांनी मान्यता दिली. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटिशांनी त्या काळी दापोलीची निवड केली होती. ब्रिटिशकालीन मिनीमहाबळेश्वरला पार्यटक आवर्जून भेट देतात. मात्र, येथील पायाभूत सुविधांचा अभाव पर्यटकांची निराशा करणारा आहे. एकीकडे निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले निसर्गसौंदर्य, स्वच्छ सुुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, किल्ले, लेण्या, मस्जीद, चर्च, पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. मात्र, याच ठिकाणी पर्यटकांना पायाभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.
दापोली तालुका अलिकडे पर्यटन तालुका म्हणून जगाच्या नकाशावर येऊ पाहात आहे. या थंड हवेमुळे महाबळेश्वरनंतर पर्यटकांची दापोलीला पहिली पसंती आहे. कधीकाळी गोव्याकडे जाणारा पर्यटक दापोलीकडे वळू लागला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा या शहरांच्या मध्यवर्ती असलेल्या दापोलीत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो, लाखो पर्यटक दापोलीत येऊ लागले आहेत. गेल्या काही वर्षांपासून केवळ महाराष्ट्र किंवा देशभरच नाही विदेशी पर्यटकही मिनी महाबळेश्वरच्या मोहात पडू लागले आहेत. पर्यटकांकडून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. मात्र, शासन पर्यटकांच्या सुविधांबाबत उदासीन आहे. पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते पर्यटकांची डोकेदुखी बनले आहेत. पर्यटनस्थळी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. मुरुड, कर्दे, लाडघर, तामसतीर्थ, कोळथरे, दाभोळ, पाळंदे, हर्णै, आंजर्ले, केळशी, आडे, पाडले येथे स्वच्छ समुद्रकिनारा आहे. मात्र, या समुद्र किनाऱ्यांकडे जाणारे रस्ते, पिण्याचे पाणी, कपडे बदलण्यासाठी चेजींग रुम, बसण्यासाठी बैठक व्यवस्था, सुलभ शौचालय, सुरक्षाकार्ड, अनुचित प्रकार घडल्यास किंवा काही दुर्घटना घडल्यास तत्काळ मदत मिळण्याची कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे असुरक्षित बनू पाहात आहेत. या किनाऱ्यांबरोबरच प्राचीन वास्तूंकडे जाणारे रस्ते व पायाभूत सुविधांचा अभाव आहे. सर्व सुविधा पर्यटन वाढीसाठी महत्त्वाच्या आहेत. कित्येक वर्षे मागणी करुनही पर्यटनस्थळांच्या विकासाबद्दल शासन उदासीन आहे.
धरणाचे प्रश्न रेंगाळल्यामुळे सिंचन व्यवस्था होऊ शकली नाही. तालुक्यात धरणे आहेत. मात्र, कालवे नाहीत. तालुक्यातील शेतीचे शून्य क्षेत्र ओलिताखाली आले आहे. दापोली तालुक्यातील धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्याची गरज आहे.
येथे कृषी विद्यापीठ आहे. मात्र, तेथील संशोधनाचा फायदा घेण्याची स्थानिक शेतकऱ्यांची मानसिकता नाही. परजिल्ह्यातील शेतकरी सहलीच्या माध्यमातून येथे येऊन माहिती घेत आहेत. परंतु स्थानिक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळायला तयार नाही. पारंपरिक पद्धतीनेच शेती करण्यावर त्यांचा अधिक भर आहे. त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे पझयत्न होणे आवश्यक आहे.


तालुक्यात फळप्रक्रिया उद्योगाची गरज आहे. आंबा, काजू, करवंद, जांभूळ यापासून कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी वाईन तयार केली आहे. अशा प्रक्रिया उद्योगांसाठी शतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.


मासेमारीवर अवलंबून असणाऱ्या उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. माशांवर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळी उत्पादने घेण्याचे प्रशिक्षण गरजेचे आहे. मासे प्रक्रिया उद्योगांना चालना द्यायला हवी.


उपजिल्हा रुग्णालय आहे, परंतु सुविधा नाहीत. रूग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. आरोग्य व्यवस्था हा समाजच्यादृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग. मात्र त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे.



दापोलीत मिनी एमआयडीसी आहे. मात्र, एमआयसडीसीत उद्योगच नाहीत. रोजगार निर्मितीचे उद्योग औद्योगिक वसाहतीत यायला हवेत. फळप्रक्रिया उद्योगाला कोकणात चांगली संधी आहे. परंतु शीत साखळी नाही. फळ काढणीपासून, फळ मार्केटला जाईपर्यंत त्याची योग्य हाताळणी होणे गरजेचे आहे. फळप्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज असून, येथील हंगामी फळांवर बारमाही प्रक्रिया होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.


चित्त थरारक अनुभव....
जिल्ह्यातील समुद्री पर्यटनक्षेत्र म्हणून दापोली तालुक्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या भागातील निसर्ग, किनारे, मंदिर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. मात्र, या भागातील पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते अरूंद असल्याने ते रूंद कधी होणार, असा प्रश्न पर्यटकांमधून होत असून, तो प्रलंबितच आहे.



दापोली येथे मिनी महाबळेश्वर अनुभवायला येतात पर्यटक.
जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या वाढतेय. मात्र, मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष.
रस्त्यांचे जाळे सुधारणार कधी असा प्रश्न.
समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करायला तरूणाईची दापोलीला अधिक पसंती.
पर्यटनस्थळांबद्दल अनास्था नको.

Web Title: Tourism facilities are essential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.