पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तीन दिवस कोकण दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 06:21 PM2022-03-25T18:21:46+5:302022-03-25T18:22:46+5:30
सिंधुरत्न योजनेचे लोकार्पण, कुडाळ येथील शिमगोत्सव कार्यक्रमाला ठाकरे यांची उपस्थिती लाभणार. लांजा येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे उद्घाटन करणार
रत्नागिरी : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात विविध विकासात्मक कामांसाठी दौरा करणार आहेत. त्याचा प्रारंभ कोकणातून हाेणार असून, २८, २९ आणि ३० मार्च रोजी ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड दौऱ्यावर येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, २८ मार्च रोजी त्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजनाचे कार्यक्रम होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. यादिवशी सकाळी १० वाजता सिंधुदुर्गातील मेरीटाईम बोर्डाची जेटी पाहणी, त्यानंतर कुणकेश्वर, देवगड येथे भूमिपूजन कार्यकम, वेंगुर्ला येथे कासव जत्रा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. पोमेंटो या कंपनीकडून पर्यटनात्मक तयार असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलची पाहणी ते करणार आहेत. तसेच सिंधुरत्न योजनेचे लोकार्पण, कुडाळ येथील शिमगोत्सव कार्यक्रमाला ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
२९ मार्च रोजी मंत्री आदित्य ठाकरे हे लांजा येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे उद्घाटन करणार आहेत. त्याचठिकाणी सभेचेही आयोजन केलेले आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे आगमन होईल. तेथे श्रींचे दर्शन घेतल्यानंतर, २१ कोटींच्या निधीतून नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व सभा असे कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर तेथील बोट क्लबची पाहणी, एमटीडीसीच्या पर्यटनमधून ३.५० कोटी मंजूर झालेल्या गेस्ट हाऊसचा शुभारंभ करणार आहेत. त्यानंतर जयगड येथून गुहागर तवसाळकडे प्रयाण. त्याठिकाणी वेळणेश्वर धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा भूमिपूजन कार्यकम व चिपळूण येथे मुक्काम करणार आहेत.
चिपळूण येथे वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाची पाहणी करून आढावा ३० रोजी सकाळी ११ वाजता घेणार आहेत. त्या ठिकाणाहून दापोलीकडे प्रयाण, तेथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमावेळी पालकमंत्री ॲड. अनिल परब हेही उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता ते महाडकडे प्रयाण करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.