गर्दीच्या हंगामात रत्नागिरीतील पर्यटनस्थळे बंद, पर्यटकांचा हिरमोड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:45 PM2022-12-27T12:45:58+5:302022-12-27T12:46:20+5:30
पर्यटनस्थळे सर्व वारी सुरू ठेवावीत, असे आदेश. परंतु, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही
रत्नागिरी : सध्या ख्रिसमसची सुट्टी पडल्याने पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. विशेषत: समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना आकर्षण असल्याने रत्नागिरी तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. एकीकडे पर्यटकांची संख्या वाढत असतानाच रत्नागिरीतील पर्यटनस्थळे मात्र बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.
नाताळची सुट्टी आणि शनिवार, रविवार जोडून आलेली सुट्टी यामुळे पर्यटकांची पावले रत्नागिरीकडे वळली आहेत. कोकणातील समुद्रकिनाऱ्याला पर्यटक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे श्रीक्षेत्र गणपतीपुळेतील गणेश मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पर्यटकांनी गर्दी केल्याने स्थानिक दुकानदारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या सरस बचत गटांच्या प्रदर्शनालाही पर्यटक हजेरी लावत आहेत.
गणपतीपुळे येथील पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर पर्यटक रत्नागिरीतील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी येत आहेत. मात्र, ही पर्यटनस्थळे सोमवारी बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. रत्नागिरीतील टिळक जन्मभूमी व थिबा पॅलेस ही पर्यटनस्थळे सोमवारी म्हणून बंद ठेवण्यात आली होती. थिबा पॅलेसच्या आवाराबाहेर तसा फलकही लावण्यात आला आहे.
त्यामुळे बाहेर जाऊन आलेल्या पर्यटकांची व सहलीतील मुलांची मोठी निराशा झाली. ही स्थळे सर्व वारी सुरू ठेवावीत, असे आदेश देण्यात आले होते. परंतु, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने पर्यटनाला त्याचा फटका बसत आहे.