सुटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनस्थळे गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:49 AM2019-05-28T11:49:42+5:302019-05-28T11:50:39+5:30
उन्हाळी सुटीमुळे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गणपतीपुळे, पावस या धार्मिक स्थळांसह सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. आरेवारे मार्गावर पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. हॉटेल्स, लॉजिंगसह यात्री निवासमध्येही गर्दी वाढली आहे.
रत्नागिरी : उन्हाळी सुटीमुळे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गणपतीपुळे, पावस या धार्मिक स्थळांसह सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. आरेवारे मार्गावर पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. हॉटेल्स, लॉजिंगसह यात्री निवासमध्येही गर्दी वाढली आहे.
शाळा, महाविद्यालयांना दीर्घ सुटी असल्याने जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी झाली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई, पुणे मार्गावर उन्हाळी सुटीनिमित्त जादा गाड्या सुरू केल्या आहेत. एस. टी.च्या शिवशाही बसेसनाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेजारच्या जिल्ह्यातून एक दिवसीय सहल काढून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पर्यटक खासगी वाहनातून एक दिवसाच्या सहलीसाठी येत आहेत. गुहागर, मार्लेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी, पावस, आडीवरे या ठिकाणी येण्याचा कल वाढला आहे. ठराविक भाडे ठरवून मंडळी खासगी बसेस, १६ सीटर, ४० सीटर गाड्या, छोट्या कार यांना मागणी वाढली आहे. एसी, नॉन एसी अशा वर्गवारीमध्ये किलोमीटरचे दर ठरविण्यात येत आहेत.
उन्हाळी सुटीबरोबर कोकणी मेव्याचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळत आहेत. एस. टी. बसेस, रेल्वे, खासगी आराम बसेसना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. प्रवाशांनी फुल्ल भरून गाड्या पळत आहेत. गणपतीपुळे, आरे-वारे, काजिरभाटी, मांडवी, भाट्ये बीच, गुहागर, राजापूर, मार्लेश्वर, रत्नागिरी, दापोली, याठिकाणी राज्यासह परराज्यातील पर्यटकांनी गर्दी केली आहे.
सुटीमुळे गणपतीपुळे, पावस परिसरात पर्यटक बहुसंख्येने आले आहेत. सागरी महामार्गाने प्रवास करीत असल्यामुळे शिरगाव येथील अरूंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. रत्नागिरी करून गोव्याला जाणारे पर्यटकही अधिक आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. रत्नागिरी, गणपतीपुळे दर्शनानंतर माघारी फिरणारेही अधिक आहेत. कोल्हापूर मार्गावरही पर्यटकांची वाहने अधिक आहेत. गर्दीमुळे गणपतीपुळे परिसरातील गावांमध्ये पर्यटक निवासासाठी थांबत आहेत.
समुद्रस्नानाचा आनंद
समुद्रात बोटिंग, किनाऱ्यावर घोडेस्वारी, परचुरी खाडीत मगर सफर, माडा पोफळींच्या बागेत कोकणी लोककलांचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वाळूत खेळण्याबरोबर समुद्रस्नानाचा आनंदही पर्यटक लुटत आहेत. दाभोळ-धोपावे मार्गावरील फेरीबोटही फायदेशीर ठरत आहे.