सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे किनारा पर्यटकांनी गजबजला, वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 12:32 PM2023-11-28T12:32:34+5:302023-11-28T12:32:55+5:30
निवासासाठी पर्यटक न थांबल्याने व्यावसायिक धास्तावले
गणपतीपुळे : श्रीक्षेत्र गणपतीपुळे (ता.रत्नागिरी) सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी गजबजून गेले आहे. शनिवार, रविवार आणि साेमवार अशा सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेचा परिसर फुलून गेला आहे. मात्र, पर्यटक या ठिकाणी थांबत नसल्याने स्थानिक व्यावसायिक धास्तावले आहेत. वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी गणपतीपुळे क्षेत्राला पसंती दिली आहे. शनिवारपासून पर्यटकांची पावले गणपतीपुळेकडे वळली असून, साेमवारपर्यंत पर्यटकांची गर्दी कायम हाेती. त्यामुळे गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला हाेता. गणपतीपुळेतील खानावळींमध्ये जेवणासाठी रांगा लागत आहेत, तसेच परिसरातील सर्वच लॉजमध्ये गर्दी पाहायला दिसत आहे.
मात्र, या ठिकाणी आलेला पर्यटक येथे न थांबता तारकर्ली, गुहागर या ठिकाणी जाण्यास पसंती देत आहे. साेमवारी अनेकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेऊन समुद्रकिनाऱ्यावर माैजमजेचा आनंद लुटला. त्यानंतर, गुहागर, श्रीवर्धन, तारकर्ली या ठिकाणी जाण्याबाबत चाैकशी केली. स्थानिक व्यावसायिकांकडे याबाबत चाैकशी केल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.
गणपतीपुळे परिसरातील आपटा, काेल्हटकर तिठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली हाेती. त्यामुळे वाहनांची काेंडी झाली हाेती. जयगड पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळेच्या पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळवी, पोलिस नाईक जयेश कीर, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश गुरव, पोलिस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहतूककाेंडी सुरळीत हाेण्यासाठी प्रयत्न केले, तसेच रत्नागिरीतूनही बंदोबस्तासाठी पाेलिस कर्मचाऱ्यांना बाेलावण्यात आले हाेते.