भोस्ते येथे जंगली लाकूड नेणारा ट्रॅक्टर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:32 AM2021-04-02T04:32:19+5:302021-04-02T04:32:19+5:30
khed-photo011 खेड तालुक्यातील भाेस्ते येथे लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली. लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : तालुक्यातील ...
khed-photo011
खेड तालुक्यातील भाेस्ते येथे लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : तालुक्यातील भाेस्ते येथे लाकूड नेणाऱ्या ट्रॅक्टरवर वनविभागाकडून कारवाई करण्यात आल्याने तालुक्यात राजराेसपणे लाकूड ताेड हाेत असल्याचे सिद्ध झाले आहे. या कारवाईत अनधिकृतरित्या साग, आईन आणि किंजळ झाडांची कत्तल करून बेकायदेशीररीत्या ट्रॅक्टरने वाहतूक केल्याप्रकरणी वनविभागाने १ लाख ४३ हजार ८८० रुपये किमतीच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त केला आहे. ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. माेठ्या प्रमाणात लाकूड ताेड असतानाही वन विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष का करण्यात येते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
खेडचे वनपाल अनिल दळवी यांनी माध्यम प्रतिनिधी यांना दिलेल्या माहितीनुसार दि. २४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील भोस्ते गावात ही कारवाई करण्यात आली. एमएच ०८, ए एन ७२८६ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अनधिकृतरीत्या साग, आईन आणि किंजळ झाडांची तोड करून त्यांची वाहतूक करण्यात येत हाेती. वनविभागाचे अधिकारी अनिल दळवी यांनी विभागीय वनक्षेत्रपाल खडे, परिक्षेत्र वनअधिकारी वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.
या कारवाईमध्ये त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये आईनची ११ झाडे १.४३२ घनमीटरची, सागाची ९ झाडे १.२७६ घनमीटरची, किंजळची १० झाडे १.५२४ घनमीटरची अशी ३० झाडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ताब्यात घेतली. तसेच ट्रॅक्टर चालक सतीश हरिश्चंद्र कोतेरे यांच्याविरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१,२, बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट
वणव्यामागे लाकूड माफिया ?
कोकणातील जंगलात लागणारे मोठमोठे वणवे हा दरवर्षी चर्चेचा विषय असतो. मात्र, कोकणात संरक्षित वनक्षेत्र कमी व खासगी जमिनी जास्त असल्याचे कारण देत या वणव्याकडे वनविभाग दुर्लक्ष करते. परंतु, उन्हाळ्याच्या सुरुवातीला लागणारे हे वणवे खासगी जंगलात विनापरवानगी करवत चालवणाऱ्या लाकूड माफियाकडून लावले जात असल्याची चर्चा आहे. या वणव्यात जंगलात वाढलेलं गवत जाळून आत प्रवेश करायचा आणि वर्षानुवर्षे वाढलेल्या झाडांची शेतकऱ्यांना अल्प मोबदला देऊन लाकूड ताेड केली जात असल्याची चर्चा आहे.