देवरूख नगरपंचायतीने केलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात व्यापारी आक्रमक, नगरपंचायतीवर व्यापाऱ्यांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 05:22 PM2022-01-20T17:22:47+5:302022-01-20T17:27:53+5:30
देवरूख नगरपंचायतीने केलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात व्यापारी वर्गात संतापाची लाट
देवरूख : देवरूख नगरपंचायतीने काल, बुधवारी अतिक्रमण हटाव मोहिम राबविली होती. त्याचे पडसाद आज, गुरूवारी उमटले. शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या कारवाईचा निषेध करत जाब विचारण्यासाठी नगर पंचायतवर धडक दिली.
नगर पंचायतच्यावतीने अतिक्रम हटाव मोहिम राबविताना चार दिवस आधी माहिती देणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्यानेच व्यापारी वर्गात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. याबाबत जाब विचारून आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत थेट नगर पंचायत वर मोर्चा काढला.
अतिक्रमणामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होते तर मग पार्किंगचा प्रश्न देखील नगर पंचायत प्रशासनाने सोडविणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही वर्षा पासून पार्किंगचा प्रश्न देखील तसाच आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध नकरताच थेट कारवाईची मोहीम का असा सवाल व्यापाऱ्यांनी यावेळी केला.
नगरपंचायत प्रशासना सोबत चर्चा करण्यासाठी व्यापारी वर्गाने धडक दिली होती. मात्र मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी भ्रमणध्वनी व्दारे त्यांच्याशी संपर्क केला. अतिरिक्त कार्यभार असल्याने मुख्याधिकारी मंगळवारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी मंगळवारी चर्चा झाल्यानंतरच कारवाई बाबतचा निर्णय घेतला जावा अशी भूमिका देखील व्यापारी वर्गाने मांडली.
दरम्यान, काल बुधवारी केलेली कारवाई हि सरसकट करण्यात आली असून यात काही व्यापाऱ्यांना नाहक त्रास देण्यात आला आहे, असा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आता यावर काय तोडगा निघणार आणि नगर पंचायत कोणती भूमिका घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.