दापोलीतील व्यापाऱ्यांनी केला मिनी लॉकडाऊनला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:32 AM2021-04-07T04:32:08+5:302021-04-07T04:32:08+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क दापाेली : शहरातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आहे. ‘उपाशी मरण्यापेक्षा दुकाने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापाेली : शहरातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आहे. ‘उपाशी मरण्यापेक्षा दुकाने सुरू ठेवू तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा आहे तो करा, आम्ही दंडसुद्धा भरणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा’, असे म्हणत दापाेली शहरातील व्यापाऱ्यांनी बंद केलेली दुकाने पुन्हा उघडली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी नगरपंचायतीवर धडक माेर्चा काढून दुकाने बंद करणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
दापोलीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असेही ते म्हणाले. दापोलीचे प्रांताधिकारी शरद पवार यांच्या दालनात व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे उपस्थित हाेते. याच बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संबोधित केले. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आल्याने व्यापाऱ्यांचा विराेध मावळला.
सरकारने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनला आमचा विरोध नाही. शनिवार व रविवार दोन दिवस पूर्णपणे आम्ही दुकाने बंद ठेवून लॉकडाऊन पाळू, असे व्यापाऱ्यांनी सांगितले; परंतु आधीच पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या व्यापाऱ्यांना पुन्हा उद्ध्वस्त करू नका, त्याला जगू द्या अशीही विनंती व्यापाऱ्यांनी केली.
अखेर प्रांताधिकारी शरद पवार यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना केल्या. बुधवारपासून या नियमांचे कडक पालन व्हावे, असे या बैठकीत ठरविण्यात आले. त्याला व्यापारी सहकार्य करतील, अशी भावना प्रांताधिकारी शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.