खेडमधील दुकाने बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:51+5:302021-04-08T04:31:51+5:30
खेड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय खेड ...
खेड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय खेड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बुधवारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत घेतल्याने अधिकारी आणि व्यापारी यांच्यामधील संघर्ष टळला आहे. मात्र पुढील आदेश होईपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सारी दुकाने बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यात सापडलेल्या राज्याला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. या प्लॅननुसार दिनांक ६ ते ३० एप्रिलदरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सारी आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. स्थानिक प्रशासनाने शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी सुरू करताच मंगळवारी (दि. ६) व्यापारी आणि अधिकारी यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष निर्माण झाला. बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यासाठी गेलेल्या अधिकारी वर्गाला व्यापाऱ्यांनी खडे बोल सुनावले.
येथील व्यापारी गेले वर्षभर लॉकडाऊनच्या वणव्यात होरपळून निघाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांचे नोकरांचे पगार थकले आहेत. व्यापारी विजेचे बिल आणि बँकांचे हप्ते भरू शकलेले नाहीत. ‘आता कुठे गाडी रुळांवर येत आहे. मात्र त्याच वेळी तुम्ही पुन्हा लॉकडाऊन लादत असाल तर आम्ही दुकाने बंद करणार नाही. तुम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील तर करा,’ अशा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली होती. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता व्यापारी आणि अधिकारी यांच्यात बैठक झाली. मात्र ती निष्फळ ठरली. व्यापारी दुकाने बंद ठेवण्याच्या मन:स्थितीत नव्हते. बुधवारी सकाळी कारवाईची भीती असतानाही व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे दुकाने उघडली होती. मात्र काही व्यापाऱ्यांनी ग्राहकांना दुकानात थेट प्रवेश देण्याचे टाळले. त्यामुळे सकाळी बाजारपेठेत गर्दी पाहावयास मिळत होती.
सकाळी ११ वाजता अधिकारी आणि व्यापारी यांच्यामध्ये दुसरी बैठक झाली. या बैठकीला प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरीक्षक निशा जाधव आणि मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे उपस्थित होते. या बैठकीत अधिकारी आणि व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार शासनाचा पुढील आदेश होईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
व्यापारी आणि अधिकारी यांच्या बैठकीत निर्णय होताच बाजारपेठ बंद झाली आणि व्यापारी-अधिकारी यांच्यामधील संघर्ष संपुष्टात आला.
.....................
khed-photo74 खेड : व्यापारी आणि अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर बाजारपेठ बंद करण्यात आली.