गावकऱ्यांच्या एकीमुळे परंपरा टिकून
By admin | Published: May 12, 2016 11:09 PM2016-05-12T23:09:14+5:302016-05-12T23:30:32+5:30
अरुण परचुरे : गुहागरातील वराती देवी मंदिराचा सुवर्ण महोत्सव सोहळा
गुहागर : वराती देवी मंदिराचा गेली ५० वर्षे अखंडपणे उत्सव होत आहे. सर्व गावकऱ्यांच्या एकीमुळे सामुहिकरित्या हा उत्सव साजरा होत आहे. पुढची १०० वर्षे ही परंपरा अशीच टिकून राहिल, असे प्रतिपादन श्री देव व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे यांनी केले.श्री वराती देवी मंदिराच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याप्रसंगी युवा मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, यामधील स्मरणिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. परचुरे म्हणाले की, हा सुवर्ण महोत्सवी सोहळा उत्तरोत्तर रंगतदार होत आहे. ज्या समाजामध्ये शौर्य व दातृत्वाचा मिलाफ आहे, असा समाज कोणतेही उद्दीष्ट साध्य करु शकतो.
वराती देवीचे आजचे स्वरुप हे अमूर्त आहे. पुढील काळात चांदीच्या मुखवट्याने रुप देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सूचित केले. मंडळामधील अनेक तरुण सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याने यापुढील काळातही मंडळाच्या कार्याचा आलेश चढता राहिल, असे परचुरे म्हणाले. भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे म्हणाले की, ही परंपरा अशीच कायम राहणार असून, पुढील काळात कोणतीही मदत देवीचरणी सेवा म्हणून करेन, असे सांगितले.
यावेळी युवा मंडळाचे अध्यक्ष सुहास सुर्वे, खरेदी-विक्री संघाचे पद्माकर आरेकर, संतोष गोयथळे, मंडळाचे सचिव राकेश गोयथळे, उपाध्यक्ष गजानन मोरे, महेंद्र पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश गोयथळे यांनी केले. (प्रतिनिधी)
गुहागरमधील वराती मंदिर सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित स्मरणिका प्रकाशन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष भरत शेटे, सुहास सुर्वे, नीलेश गोयथळे, पद्माकर आरेकर, संतोष गोयथळे, राकेश गोयथळे उपस्थित होते.