परशुराम घाटातील वाहतूक २५ एप्रिल ते १० मे पर्यंत दररोज पाच तास राहणार बंद
By अरुण आडिवरेकर | Published: April 20, 2023 09:03 PM2023-04-20T21:03:10+5:302023-04-20T21:03:18+5:30
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दाैऱ्यात त्यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कामाने वेग घेतला आहे.
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाहतूक २५ एप्रिल २०२३ ते १० मे २०२३ या कालावधी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी गुरूवारी रात्री उशिरा दिले आहेत. या कालावधीमध्ये हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे मिळवण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दाैऱ्यात त्यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कामाने वेग घेतला आहे. परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. साधारण ५.४० किलाेमीटर इतक्या लांबीचा हा घाट असून, त्यातील ४.२० किमी लांबीच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित १.२० किमी भाग हा डोंगररांगा आणि खोल दरीचा असल्यामुळे चौपदरीकरणाच्या कामासाठी अवघड स्वरूपाचा आहे. त्यामुळे हे काम करताना घाट वाहतुकीसाठी बंद करावा, अशी मागणी कशेडी परशुराम हायवे प्रा. लि. या नियुक्त ठेकेदाराने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. तर रत्नागिरी विभागासह येथे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण – रायगड यांनीही ही मागणी केली होती.
घाटातील वाहतूक बंद ठेवल्यास अधिक वेगाने काम करता येईल, अशी धारणा हे काम करणाऱ्या नियुक्त ठेकेदार कंपनीची आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात येत हाेती. अखेर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गुरूवारी रात्री उशिराने हा घाट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार २५ एप्रिलपासून घाटातील वाहतूक बंद राहणार आहे.