एस.टी.च्या नादुरुस्त मालवाहतूक गाडीमुळे वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:30+5:302021-09-25T04:33:30+5:30
आरवली : एस. टी. महामंडळाची मालवाहतूक करणारी गाडी भर बाजारपेठेत बंद पडल्याने वाहतुकीचा दोन तास खोळंबा झाल्याचा प्रकार गुरुवारी ...
आरवली : एस. टी. महामंडळाची मालवाहतूक करणारी गाडी भर बाजारपेठेत बंद पडल्याने वाहतुकीचा दोन तास खोळंबा झाल्याचा प्रकार गुरुवारी कडवई बाजारपेठेत घडला. स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर ही गाडी बाजूला करून वाहतुकीला रस्ता मोकळा करून दिला. मात्र, एस. टी. महामंडळाच्या या गाडीत कोणतीही दुरुस्तीची हत्यारे नसल्याने महामंडळाच्या ढिसाळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
लाॅकडाऊनमध्ये महामंडळाने कर्मचाऱ्यांना काम देण्यासाठी जुन्या बसच्या मालगाड्या तयार करून महाकार्गो या गोंडस नावाखाली व्यवसाय सुरू केला. या गाड्यांची स्थिती वाहतुकीला योग्य नसल्याचे अनेक वेळा समोर येत आहे. या गाड्यांमधून सिमेंट, बांबू, चिरा अशा अवजड सामानाची वाहतूक केली जात आहे. कडवई बाजारपेठेत रत्नागिरी आगाराची गाडी (एमएच १२, बीएल ३२२६) सिमेंट घेऊन आली हाेती. ही गाडी भर रस्त्यातच बंद पडल्याने कडवई - चिखली रस्त्याच्या दुतर्फा दोन तास गाड्या अडकून पडल्या हाेत्या. या गाडीचा स्टार्टर लागत नसल्याने गाडी सुरू हाेण्यास अडचणी येत हाेत्या.
कडवईतील स्थानिकांनी गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, गाडी दुरुस्तीचे काेणतेच सामान नसल्याने अडचणी येत हाेत्या. अखेर ग्रामस्थांच्या मदतीने ही गाडी रस्त्याच्या बाजूला ढकलून रस्ता मोकळा करण्यात आला.
त्यानंतर काही तासांनी देवरुख आगराच्या दुरुस्ती पथकाने दुसऱ्या बॅटरीच्या साहाय्याने गाडीला स्टार्टर मारून गाडी सुरू केली.