चिपळुणातील अंतर्गत रस्त्यावर वाहनांचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:43+5:302021-05-20T04:34:43+5:30
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी येथील पोलीस यंत्रणेकडून बाजारपेठेतील मुख्य रस्ता सील करण्यात आला आहे. परिणामी ...
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी येथील पोलीस यंत्रणेकडून बाजारपेठेतील मुख्य रस्ता सील करण्यात आला आहे. परिणामी बाजारपेठेला पर्यायी असलेल्या अंतर्गत रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी वाढली आहे. बुधवारी वडनाका ते बेंदरकरआळी परिसरात अक्षरशः वाहनांचा चक्का जाम झाला होता. बाजारपेठेतील गर्दी कमी होण्याऐवजी वाहतूक कोंडीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गेले महिनाभर येथील बाजारपेठ बंद असून, मुख्य रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी चिंचनाका ते बाजारपूलदरम्यानचा मार्ग बॅरिकेट्स उभारून बंद केला आहे. त्यामुळे या मार्गाने सकाळच्या सत्रात एकही वाहन सोडले जात नाही. त्याचवेळी बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी काही दुकाने उघडी राहत असल्याने अनेकजण खरेदीसाठी येतात. त्यामुळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्याला पर्यायी मार्ग असलेल्या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊ लागली आहे. मंगळवारी शहरातील खेड रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर बुधवारीही वडनाका, बेंदरकरआळी, वाणीआळी व जुन्या कालभैरव मंदिराकडील रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. एकाचवेळी तिन्ही मार्गावरून वाहने आल्याने काहीवेळ चक्का जाम झाल्याची स्थिती निर्माण झाली होती.
एकीकडे गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांनी केलेली ही उपाययोजना असली, तरी त्याचे विपरित परिणाम होताना दिसत आहेत. मुख्य रस्त्यावर गर्दी न होता अंतर्गत रस्त्यावर वाहनांची ये-जा वाढल्याने त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकाराने अंतर्गत भागातील नागरिकही हैराण झाले आहेत. आधीच अरुंद रस्ते आणि त्यात वाहनांची गर्दी होऊ लागल्याने नागरिकांना घराबाहेर येणेही कठीण झाले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने ही गर्दी टाळण्यासाठी अन्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एकतर मुख्य रस्ता खुला करावा, अन्यथा सकाळच्या सत्रात शहरात बाहेरून येणारी वाहने रोखण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
...........................
कोरोनाच्या परिस्थितीत नागरिकांनी गर्दी न करता संयम बाळगणे गरजेचे आहे. तूर्तास अंतर्गत मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता काही ठिकाणी एकेरी वाहतूक होईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच लोटे व खडपोली औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाजारपेठेतून न सोडता गुहागर बायपास व महामार्गाने सोडण्याबाबत उपाययोजना करीत आहोत.
देवेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक, चिपळूण