खेडमध्ये वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:21 AM2021-06-21T04:21:40+5:302021-06-21T04:21:40+5:30
खेड : खेडमधील खेड-दापोली मार्गावर आणि शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने येथील ...
खेड : खेडमधील खेड-दापोली मार्गावर आणि शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने येथील वाहतूक पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती. सध्या बंदोबस्तात असल्याने खेडमध्ये वाहतूक पोलिसांच्या चौकीची नितांत गरज आहे.
पावसामुळे गुहागरात वित्तहानी
गुहागर : सलग पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील आठ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानीची किंमत एक लाख ३९ हजार ५० रुपये असून, तलाठी आणि ग्रामसेवकांनी सर्व घरांचा पंचनामा केला आहे. तालुक्यात सलग तीन दिवस पाऊस कोसळत आहे.
खेडमध्ये रुग्णसंख्येत घट
खेड : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ही समाधानकारक बाब तरीही अँँटिजन चाचणी, आरटीपीसीआर चाचणी मोहीम सुरूच आहे. त्यामुळे कोरोना कोविडची परिस्थिती जैसे थे आहे.
जैव वैद्यकीय कचऱ्याची समस्या
चिपळूण : कोरोनाबाधित रुग्णांसाठी आधार ठरणाऱ्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात सध्या कोविड जैव वैद्यकीय कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न रुग्णालय व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे.
हळद रोपांचे वाटप
दापोली : आमदार योगेश कदम यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील देवांगमधील शेतकऱ्यांना हळद रोपांचे वाटप करण्यात आले. आमदार कदम यांनी कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना हळद लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचे उद्देशाने गावागावात मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
घरे, गोठ्यांचे नुकसान
मंडणगड : पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील एका घराचे पूर्णत:, तीन घरांचे अंशत: व एका गोठ्याचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली. तिडे गावात एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाचा जोर ओसरला
रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या तिन्ही तालुक्यात रविवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर ओसरल्याने विस्कळीत झालेली वाहतूक, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.
गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरूच
रत्नागिरी : अनावश्यक सेवेतील दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मालिका रत्नागिरी शहर पोलीस व अन्य तालु्क्यांमध्ये सुरूच ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर अनेक व्यापारी ठरावीक वेळेत दुकाने बंद न करता ते सुरूच ठेवतात.
खड्ड्यांमुळे वाहनधारकांकडून संताप
चिपळूण : तालुक्यातील पेढांबे येथील पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. खोल खड्ड्यात वाहने अडकल्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून खड्डे बुजवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
माखजन पंचक्रोशीत भातशेतीचे नुकसान
देवरूख : पाटबंधारे विभागाच्या मध्यम प्रकल्पांतर्गत कालव्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने माखजन पंचक्राेशीतील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कालव्याच्या बंदिस्त पाइपलाइनसाठी माखजन परिसरात खोदाई सुरू आहे.