परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 06:06 PM2019-07-16T18:06:27+5:302019-07-16T18:17:02+5:30
परशुराम घाटात मंगळवारी (16 जुलै) पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.
चिपळूण - परशुराम घाटात मंगळवारी (16 जुलै) पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसाचा रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. सोमवारी चिपळूण शहराची बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आज परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प आहे.
सोमवारी दापोली-खेड हा मार्ग बंद झाला तर मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सकाळी 7.10 वाजताच गाठल्याने सकाळी 9.30 वाजल्यापासून रस्ता वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच रत्नागिरी-गुहागर भातगाव मार्गे वाहतूक बंद झाली होती. रस्त्यावर मोठे दगड व दरड कोसळल्याने तसेच पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. गुहागर-भातगाव-रत्नागिरी मार्ग मेढे तर्फे फुणगुस येथे मोठी दगड व दरड कोसळल्याने तसेच रस्ता वाहून गेल्याने मार्ग बंद झाला.
पावसाचा जोर वाढताच महामार्गासह शहरातील खड्ड्यांची संख्या आणि आकारही वाढत असल्याचे समीकरण दरवर्षी पहायला मिळते. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. पनवेल परिसरातील मुंबई-गोवा महामार्गावर तारा, पळस्पे फाटा, ओएनजीसी परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने उसळत आहेत. त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच चारचाकी वाहनांचेही नुकसान होत आहे.
कोकणवासियांसाठी मुंबई-गोवा महामार्ग महत्त्वाचा मार्ग आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महामार्गाची बरीच कामे पूर्ण झाली आहेत. तसेच रुंदीकरणाचे कामही वेगात सुरू आहे. मात्र कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने पावसाच्या सुरुवातीलाच महामार्ग खड्डेमय झाला आहे. सध्याच्या घडीला कर्नाळा, आपटा फाटा, तारा गाव आदी ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली पहायला मिळते. खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा वेग आपोआपच मंदावतो. गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. त्यातच हा मार्ग खड्डेमय असल्यास अपघात होऊन कोंडीत आणखी भर पडते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची त्वरित डागडुजी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.