डिझेल संपल्याने रत्नागिरी आगारातील वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:13 AM2019-11-20T10:13:57+5:302019-11-20T10:14:59+5:30
रविवारी सुटी असल्याने आर्थिक व्यवहारासाठी पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत. शिवाय रत्नागिरी आगाराच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक आहे. सोमवारी रत्नागिरी आगारातील डिझेलसाठा संपल्यामुळे टँकरची मागणी नोंदविणे आवश्यक होते.
रत्नागिरी : आगारातील डिझेल सोमवारी संपले. मात्र, डिझेल टँकर मागणीसाठी आगाराकडे असलेल्या आर्थिक चणचणीमुळे रत्नागिरी आगारातील शहरी तसेच ग्रामीण बसवाहतूक ठप्प झाली. दिवसभरात २३२ फेऱ्या न सुटल्यामुळे सव्वा दोन लाखाचा आर्थिक फटका रत्नागिरी आगाराला बसला आहे.
रविवारी सुटी असल्याने आर्थिक व्यवहारासाठी पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत. शिवाय रत्नागिरी आगाराच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक आहे. सोमवारी रत्नागिरी आगारातील डिझेलसाठा संपल्यामुळे टँकरची मागणी नोंदविणे आवश्यक होते. मात्र, पैशांअभावी टँकर मागणी नोंदवू न शकल्याने गाड्या बंद ठेवाव्या लागल्या. शहरी मार्गावरील ११८, तर ग्रामीण मार्गावरील ११४ फेºया रद्द झाल्याने सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले.
सायंकाळी शाळा सुटल्यानंतर, तसेच कर्मचारी कामावरून सुटल्यानंतर प्रत्येक थांब्यावर प्रचंड गर्दी झाली होती. अनेक फेऱ्या दुपारपासून रद्द करण्यात आल्याने शहरी तसेच ग्रामीण बसस्थानकातून प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रत्नागिरी आगार व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना त्रास सोसावा लागला.