वेरळ घाटात टँकर बंद पडल्याने वाहतूक सहा तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:36 AM2021-08-20T04:36:40+5:302021-08-20T04:36:40+5:30
लांजा : बंद पडलेल्या कंटेनरला समोरून येणाऱ्या टँकरची बाजू न मिळाल्याने धडक बसून तो बंद पडल्याचा प्रकार गुरुवारी ...
लांजा : बंद पडलेल्या कंटेनरला समोरून येणाऱ्या टँकरची बाजू न मिळाल्याने धडक बसून तो बंद पडल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी सहा वाजता वेरळ घाटामध्ये घडला. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प झाली हाेती. दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वेरळ घाटातील यू आकाराच्या वळणावर बुधवारी (दि. १८) सायंकाळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनरचा ॲक्सल तुटल्याने कंटेनर बंद पडलेला होता. त्यामुळे वळणावर एकेरी वाहतूक सुरू होती. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान गोव्याहून मुंबईच्या दिशेने रसायन घेऊन जाणारा टँकर वेरळ घाटात यू आकाराच्या वळणावर आला. टँकरचालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बंद पडलेल्या कंटेनरला चालकाच्या बाजूला टँकर घासला गेला व अचानक बंद पडला. वळणावरच टँकर बंद पडल्याने तो मागे घेणे अवघड झाले.
याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच वाहतूक पोलीस रहिम मुजावर, चालक चेतन घडशी, हातखंबा येथील वाहतूक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी सकाळी ११ वाजता महामार्गावरील काम करणारा जेसीबी बोलावून बंद पडलेला टँकर बाजूला केला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक पावस व काजरघाटी तसेच कुरचुंब दाभोळेमार्गे वळविण्यात आली होती.