मोडकाआगर पुलावरून मेअखेर हाेणार वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:12+5:302021-04-16T04:31:12+5:30

असगोली : अखेर बहुचर्चित मोडकाआगर धरणातील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या ...

Traffic from Modkaagar bridge will end in May | मोडकाआगर पुलावरून मेअखेर हाेणार वाहतूक

मोडकाआगर पुलावरून मेअखेर हाेणार वाहतूक

Next

असगोली : अखेर बहुचर्चित मोडकाआगर धरणातील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या संरक्षक भिंती बांधून मग जोडरस्त्यासाठी भराव टाकला जाणार आहे. मात्र, जिल्ह्यात लागलेल्या निर्बंधांमुळे कामाच्या वेगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पूल वापरण्यास मेअखेरपर्यंत गुहागरकरांना वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, संरक्षक भिंतींचे काम सुरू करण्यासाठी धरणाच्या बाजूचा पर्यायी मार्ग रुंद करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागरपासून ६ किलाेमीटर अंतरावर मोडकाआगरचे धरण आहे. या धरणावरील पूल ४ वर्षांपूर्वी धोकादायक असल्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला हाेता. तेव्हापासून मोडकाआगरचा पूल चर्चेत आला. फेब्रुवारी २०२० मध्ये मनीषा कन्स्ट्रक्शनने गुहागर तालुक्यात महामार्गाच्या कामाला सुरुवात केली. एप्रिल २०२० मध्ये देशात दुसरी टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हा जिल्हा प्रशासनाने मोडकाआगर धरणात नव्या पुलाचे काम करण्याचा आग्रह ठेकेदाराकडे धरला. त्यावेळी दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल, अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी पुन्हा एकदा पुलाच्या कामावरून वादंग माजले. या बहुचर्चित नव्या पुलावर गुरुवारी स्लॅब ओतून पूर्ण झाला आहे. आता २१ दिवस पुलाच्या स्लॅबवर पाणी मारण्याचे काम सुरू आहे. या नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. या भिंती बांधून झाल्यावर मधल्या भागात भराव टाकून पुलाचे जोडरस्ते तयार करण्यात येतील. स्लॅबचे काम झाल्यावर दोन्ही बाजूला संरक्षक भिंती बांधताना पर्यायी मार्ग रुंद करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुलाच्या एका बाजूला धरणात भराव टाकून पर्यायी मार्ग रुंद करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर संरक्षक भिंतींच्या कामालाही लगेचच सुरुवात करण्यात येणार आहे. नियोजित वेळेत काम पूर्ण झाले, तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकते. मात्र, बुधवारी (दि. १४) सायंकाळपासून लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे हे नियोजन बारगळण्याची भीती पुलावरील कर्मचाऱ्यांना वाटत आहे.

काेट

संरक्षक भिंती बांधण्यासाठी स्टील, सिमेंट व वाळूची आवश्यकता आहे. निर्बंधामुळे हा माल पुरवठादाराकडून वेळेवर पोहाेचला नाही, तर कामावर परिणाम होईल. शिवाय हॉटेल, टपऱ्या बंद झाल्यावर कामगारांचे जेवणाचे हाल होतील. अशा परिस्थितीत कामगार पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. नियोजित कामे करण्यास विलंब झाला, तर ठरलेल्या वेळेत रस्ता करणे कठीण होईल.

- धीरज चौधरी, पर्यवेक्षक अभियंता, मोडकाआगर पूल

Web Title: Traffic from Modkaagar bridge will end in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.