..अखेर परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरु, चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सोडला सुटकेचा निश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 07:24 PM2022-07-09T19:24:02+5:302022-07-09T19:42:07+5:30
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळत असल्याने चार दिवसापासून हा मार्ग बंद केला होता.
संदीप बांद्रे
चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळत असल्याने चार दिवसापासून हा मार्ग बंद केला होता. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहने चिपळूण व लोटे येथे थांबवून ठेवली होती. मात्र शनिवारी पावसाचा जोर कमी होताच थांबवलेली वाहने परशुराम घाटातून एकेरी पद्धतीने सोडण्यात आली. त्यामुळे चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, परशुराम घाट नियमित वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत उशिरा पर्यंत निर्णय झाला नव्हता.
अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने ५ ते ९ जुलै दरम्यान रेड अलर्ट जाहीर केला होता. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाभर सज्ज ठेवला आहे. अशातच परशुराम घाटात दोन वेळा दरड कोसळली होती. या घटनेमुळे परशुराम घाट ९ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व वाहनांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानिर्णयामुळे घाटाच्या दोन्ही बाजूने म्हणजेच चिपळूण शहरानजिकच्या कापसाळ येथे, तर खेड तालुक्यातील लोटे येथे अवजड वाहनांच्या मोठ्य रांगा लागल्या होत्या. तब्बल चार दिवस ही अवजड वाहने जागच्या जागी उभी होती.
अडकून पडल्याने चालक व वाहक हैराण
या वाहतूकदारांना काही सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी पाणी व अन्नाची व्यवस्था करून दिली. शिवसेना युवासेना संघटनेचे कार्यकर्ते रात्रभर कळबंस्ते व लोटे येथे काम करीत होते. मात्र सलग चार दिवस अडकून पडल्याने चालक व वाहक हैराण झाले होते. अखेर शनिवारी पावसाचा जोर कमी होताच वाहने एकेरी मार्गाने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी व पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे हे महामार्गावरील वाहतुकीवर लक्ष ठेवून होते. आधी लोटे येथील वाहने, तर त्यानंतर चिपळुणातील वाहनांना सोडण्यात आली. त्यामुळे शहरातील बहादूरशेख नाका ते डीबीजे महाविद्यालय दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.