भाेस्ते घाटात दरड कोसळल्याने तासभर वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:14+5:302021-06-26T04:22:14+5:30
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात शुक्रवारी (२५ जून रोजी) सकाळी ८ वाजेच्या सुमारास दरड कोसळून गोव्याच्या ...
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात शुक्रवारी (२५ जून रोजी) सकाळी ८ वाजेच्या सुमारास दरड कोसळून गोव्याच्या दिशेने होणारी वाहतूक ठप्प झाली हाेती़ ही दरड हटविण्यासाठी कंपनीच्या प्रशासनाला घटनास्थळी पाेहाेचण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागला़ त्यामुळे वाहने अडकून पडली हाेती़ तासाभरानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली़
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजता खेड तालुक्यातील भोस्ते घाटात डोंगराच्या शिखराकडून दगडमिश्रित माती घसरू लागली व काही क्षणातच भला मोठा दगड खाली कोसळला. महामार्गावर आलेल्या दगड मातीच्या ढिगाऱ्यामुळे एका बाजूची वाहतूक पूर्ण ठप्प झाली. शहरापासून अवघ्या चार किलाेमीटर अंतरावर दरड काेसळूनही तासभर काेणतीच हालचाल करण्यात आलेली नाही़ गेली चार वर्षे कल्याण टोलवेज कंपनी कशेडी ते परशुराम या ४४ किलाेमीटर टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम करत आहे. मात्र, भोस्ते घाटातील कोसळलेली दरड हटवण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यासाठी कंपनीच्या प्रशासनाला एक तासापेक्षा जास्त वेळ लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे़
भोस्ते घाटाचे रुंदीकरण करताना काही ठिकाणी उभा डोंगर कापून काढण्यात आला आहे. यामुळे पावसाच्या पहिल्या महिन्यातच महामार्गावर दरड कोसळली असावी, असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला. भोस्ते घाटात दरड कोसळल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठेकेदार कंपनीला जाग आली आणि ९ वाजण्याच्या सुमारास जेसीबीसह कंपनीचे कामगार रस्त्यावर पडलेली दगड, माती हटवण्यासाठी हजर झाले. दरम्यान, घाटात वाहनांची लांब रांग लागली होती. काही वाहनचालकांनी थोडी माती, दगड रस्त्यावरून हटवून छोट्या चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू केली. भोस्ते घाटात संभाव्य दरड कोसळण्याची शक्यता गृहीत धरून ठेकेदार कंपनीने आपत्कालीन व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
---------------------------------------
मुंबई- गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली हाेती़