ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची बेसुमार लूट

By admin | Published: May 22, 2016 10:58 PM2016-05-22T22:58:16+5:302016-05-23T00:17:29+5:30

रत्नागिरी-मुंबई प्रवास : गर्दीच्या हंगामात दीड हजारपर्यंत भाडे

Trail of looted passengers from travel companies | ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची बेसुमार लूट

ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची बेसुमार लूट

Next

रत्नागिरी : मे महिन्याचा हंगाम असल्याने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. मुंबई वा पुण्याला जाण्यासाठी आता गर्दीच्या हंगामात ११०० ते १५०० रुपये मोजावे लागत आहेत. एस. टी. महामंडळाने दोन-चार रुपये वाढवले तर ओरड केली जाते. मात्र, खासगी ट्रॅव्हल्सकडून चाललेल्या लुटीबाबत सर्वच मूग गिळून गप्प आहेत.
सध्या उन्हाळ्याची सुटी सुरु आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथे नोकरीनिमित्त असलेले हजारो लोक जिल्ह्यात आले आहेत. तीव्र उन्हामुळे एस. टी. आणि रेल्वेच्या गाड्यांचा प्रवास नकोसा वाटतो. तरीही एस. टी. आणि रेल्वेला तोबा गर्दी असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. रत्नागिरी - दादर पॅसेंजर रेल्वे गाडी रत्नागिरी स्थानकातच हाऊसफुल होत आहे. रत्नागिरीतूनच मुंबईपर्यंत रेल्वेने प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो. रत्नागिरी - दादर पॅसेंजर नेहमीच प्रवाशांनी लगडलेली असते. त्यामुळे गर्दीच्या हंगामात रत्नागिरीहून रात्रीच्या वेळेस मुुुंबईकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू केल्यास भार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
एस. टी. महामंडळाच्या गाड्यांनी प्रवास करणे नेहमीच सोयीचे असते. कारण एखादा अपघात झाला, तर महामंडळाकडून जखमी प्रवाशांवर उपचार केले जातात. तसेच अपघातात प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला आर्थिक मदतीचा हातभार दिला जातो. तसेच गाडी रस्त्यात नादुरुस्त झाली तर महामंडळाकडून दुसऱ्या गाडीने प्रवाशांची सोय करण्यात येते. एकंदरीत एस. टी. प्रवास फायद्याचा आणि सुरक्षित ठरू शकतो, तरीही लोक दामदुप्पट रक्कम मोजून खासगी वाहनाने प्रवास का करतात.
रेल्वे व एस. टी.च्या गाड्यांना तुफान गर्दी असल्याचा गैरफायदा येथील खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या घेत आहेत. रेल्वे, एस. टी. आणि रेल्वेच्या गाड्यांना असलेल्या गर्दीमुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत. हंगाम नसताना ४०० ते ५०० रुपये तिकीट विक्री असलेल्या ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची लूट सुरु आहे. या ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून ११०० ते १५०० रुपयांपर्यंत तिकीट विक्री सुरू आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Trail of looted passengers from travel companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.