रत्नागिरी: भोस्ते घाटात ट्रेलरची तीन वाहनांना धडक, पाचजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 04:42 PM2022-10-18T16:42:49+5:302022-10-18T16:43:29+5:30
अपघातानंतर महामार्गावर सगळीकडे तेल पसरल्यामुळे अनेक वाहने घसरुन पडली
हर्षल शिरोडकर
खेड : तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावर भोस्ते घाट अपघाताचा प्रवण क्षेत्रच बनत चालले असून, आज, मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रेलरने तीन वाहनांना धडक दिली. या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. खेडमधील भोस्ते घाटातील अवघड वळणावर हा अपघात झाला.
या अपघातात ट्रेलर (आरजे १४, क्यूके ७७३३) ने देवरूख - भिवंडी एसटी बस (एमएच १३, सीयू ६५८५), महिंद्रा पिकअप (एमएच ०९, एफएल ४५९१) व दुचाकी अशा तीन वाहनांना धडक दिली आहे. हा ट्रेलर इतका भरधाव वेगात होता की, वाहनांना धडकून हा ट्रेलर संरक्षण भिंतीवर जाऊन आदळला आणि थांबला. ट्रेलरच्या धडकेत एसटी बस, दुचाकी आणि महिंद्रा पिकअप या तीन वाहनांना धडक दिली आहे. हा ट्रक इतका भरधाव वेगात होता यामुळे संरक्षण भिंतीला जोरदार ठोकर देत थांबला.
या भीषण अपघातामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खेडमधील लवेल येथील घरडा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातानंतर महामार्गावर सगळीकडे तेल पसरल्यामुळे अनेक वाहने घसरुन पडली. त्यामुळे एक तास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तात्काळ उपाययोजना केली.